स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा इशारा…
मालवण, ता. ८ : कोळंब पुलावरून चार दिवसांपूर्वी एसटी बसफेरी सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसात एकही बसफेरी या पुलावरून सुरू न केल्याने संतप्त स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी येथील आगारात धडक देत आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना चांगलेच फैलावर घेतले. उद्या सकाळपासून कोळंब पुलावरून बसफेरी सुरू न झाल्यास आगारास टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.
दरम्यान सभापती सभापती सोनाली कोदे यांना कार्यालयाच्या बाहेर ताटकळत ठेवल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी आगारव्यवस्थापक बोधे यांना चांगलेच सुनावले.
कोळंब पुलावरून एसटी बसफेरी सुरू न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. चार दिवसांपूर्वी या पुलावरून एसटी बसफेरी सुरू झाल्याने नियमित बसफेरी सुरू होईल असे ग्रामस्थांना वाटले. मात्र प्रत्यक्षात गेले चार दिवस एकही बसफेरी या मार्गावरून न सोडल्याने संतप्त बनलेल्या स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली एसटी आगारात धडक दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, लोकसभा मतदार संघ उपाध्यक्ष बाबा परब, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, रेवंडी सरपंच प्रिया कांबळी, अमू हर्डीकर, संदीप भोजने, युवराज कांबळी यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.