महामार्ग दुरवस्थेबाबत उपअभियंता आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

173
2

सतीश सावंत यांची मागणी : चिखलफेक हा ठेकेदार, उपअभियंत्यांच्या अकार्यक्षमतेबाबतचा उद्रेक

कणकवली, ता. ०८ : महामार्ग ठेकेदार आणि हायवे अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळे महामार्गावर अपघात होत आहेत. तेर्सेबांबर्डे येथे हकनाक ट्रक चालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता पोलिसांनी हायवे अधिकारी आणि हायवे ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज केली. तसेच आमदार नीतेश राणे यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने झालेले होते. तर कार्यकर्त्यांकडून झालेली चिखलफेक हा सर्वसामान्य जनतेचा हायवे ठेकेदार आणि उपअभियंता यांच्या अकार्यक्षमतेवरील उद्रेक होता असेही ते म्हणाले.
येथील स्वाभिमान पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, हायवेच्या दुरवस्थेबाबत लोकशाही मार्गाने आंदोलने झाला. हायवे अधिकारी, ठेकेदारांना पावसाळी धोक्याची कल्पनाही देण्यात आली. पण हायवे अधिकारी आणि ठेकेदाराची यंत्रणा ढिम्म राहिली. अखेर सर्वसामान्यांना महामार्गावरून चालणे मुश्कील झाल्याने पुन्हा एकदा लोकशाही मार्गानेच आंदोलन करण्यात आले. मात्र कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आणि हायवे उपअभियंता शेडेकर यांच्यावर चिखलफेक झाली.

आता तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का?
महामार्गावर जीवित हानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. हायवेच्या दूरवस्थेमुळे ट्रकचालकाचा हकनाक बळी गेला. त्यामुळे आता तरी ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्‍न सतीश सावंत यांनी उपस्थित केला आहे.

पालकमंत्र्यांकडून सूडबद्धीचा वापर, दरोडेखोरांची वागणूक
महामार्ग आंदोलन हे जनतेसाठी होते. मात्र या आंदोलनात अटक केलेल्या स्वाभिमान कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासन दरोडेखोराप्रमाणे वागणूक देत आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सूडबुद्धी वापरून कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पोलिस कोठडीमध्ये ठेवले आहे असे श्री.सावंत म्हणाले.

4