मृत ट्रक चालकाच्या घरी चंद्रकांतदादा जाणार का?

2

बंडू हर्णे यांचा सवाल : पालकमंत्री आतातरी गुन्हा दाखल करणार का?

कणकवली, ता. ०८ : हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावरील चिखलफेकीनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील तातडीने शेडेकर यांच्या घरी गेले. तेवढीच तत्परता दाखवून पाटील आता तेर्सेबांबार्डे येथे अपघातात बळी पडलेल्या ट्रक चालकाच्या घरी जाऊन दाखवणार का? असा प्रश्‍न नगरसेवक बंडू हर्णे यांनी आज उपस्थित केला.
श्री.हर्णे यांनी नगराध्यक्ष दालनात आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत, नगरसेवक अ‍ॅड.विराज भोसले, माजी नगरसेवक अण्णा कोदे, अजय गांगण आदी उपस्थित होते.
श्री.हर्णे म्हणाले, महामार्ग ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावरील तेर्से बांबर्डे येथे ट्रक अपघातग्रस्त झाला. यात ट्रक चालकाला आपला प्राण गमवावा लागला. हायवेच्या दुरवस्थेची जबाबदारी स्वीकारून आता बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्रक चालकाच्या कुटुंबीयांना भेटण्याची तत्परता दाखवायला हवी. तसेच पालकमंत्र्यांनीही इशारा दिल्याप्रमाणे ट्रक चालकाच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. याखेरीज गेल्या आठवड्यात तिवरे धरण फुटून 23 जणांना बळी गेला आहे. या धरणबाधितांच्या घरी जाऊन त्यांचे दु:ख पुसण्यासाठी चंद्रकांतदादा मुहूर्ताची वाट बघतात का? असाही प्रश्‍न हर्णे यांनी आज उपस्थित केला.
श्री.हर्णे म्हणाले, राणेंच्या आंदोलनावर संदेश पारकर टीका करीत आहेत. पण ज्यावेळी कणकवली शहरात पाणी तुंबले, अनेक घरांना पाण्याने वेढा दिला. त्यावेळी संदेश पारकर कुठे होते? पाणी तुंबल्याने शहरातील नागरिकांची 83 लाखांची नुकसानी झाली, त्याची भरपाई पारकर करून देणार का? खरं तर संदेश पारकर यांचा खड्ड्यातून जाणार्‍या जनतेचं दु:ख दिसत नाही. त्यांचे ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांवरील प्रेम अधिक उफाळून आलंय.

त्यावेळी पोलिस यंत्रणा कुठे होती?
महिन्यापूर्वी प्रांत कार्यालयात हायवे उपअभियंता शेडेकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली होती. पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा प्रकार झाला होता. त्यावेळी सक्षम पोलिस यंत्रणेने गुन्हे दाखल का केले नाहीत? असाही प्रश्‍न श्री.हर्णे यांनी उपस्थित केला.

11

4