राजू मसूरकर यांची माहिती : आंदोलनानंतर प्रशासन खडबडून झाले जागे
सावंतवाडी, ता. ०८ : शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दोन वैद्यकिय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यात जनरल सर्जन व स्त्री रोगतज्ञ यांचा समावेश आहे.
रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी घेवून आज सकाळी सर्व पक्षीय व ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर येत्या चार दिवसात संबंधित डॉक्टर पदभार स्विकारणार आहेत, अशी माहिती सावंतवाडी माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी राजू मसूरकर यांनी दिली.
शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त होती. ती तात्काळ भरण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य सिद्धेश परब, शिवसेनेचे युवा उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, मयुर आरोलकर आदी पदाधिकार्यांनी ग्रामस्थांसह त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी केली. यानंतर श्री. मसूरकर यांनी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पदे भरा अशी मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दोन वैद्यकिय अधिकारी नेमण्याचे आश्वासन दिले तसेच येत्या चार दिवसात ते डॉक्टर हजर होतील असे सांगितले आहे.