जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची वाणवा,सात पदे प्रभारी चालवितायत : गतिमान कारभाराला लागतोय ब्रेक

167
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी / विनोद दळवी : शासनाच्या प्रत्येक योजनेत राज्यात आघाडीवर असलेली व कारभारात राज्यात आदर्शवत असलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सध्या अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांनी ग्रासली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक यांसह सात प्रमुख अधिकारी पदे रिक्त आहेत. याचा पदभार अन्य अधिकारी हाकत आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या गतिमान कारभाराला ब्रेक लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कारभार हाकण्यात व शासनाची कोणतीही योजना यशस्वी करण्यात महाराष्ट्रात आदर्शवत म्हणून नावलौकीक मिळवून आहे. प्रत्येक योजना यशस्वी करण्यात हातखंडा असलेल्या या जिल्हा परिषदेला अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांनी ग्रासले आहे. अधिकारी रिक्त पदे हि जिल्हा परिषदेची डोकेदुखी ठरत आहे. सध्या जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, समाज कल्याण अधिकारी, महिला व बाल कल्याण विकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हि प्रमुख सहा अधिकारी पदे रिक्त आहेत.
यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हरीश जगताप हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने या पदाचा पदभार सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. पराडकर यांच्या या दोन पदांसाठी मालवण गटविकास अधिकारी हा दुसरा अतिरिक्त पदभार पूर्वीपासूनच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक जगताप यांची सप्टेंबर २०१८ मध्ये बदली झाली तेव्हा पासून हे पद प्रभारी हाकत आहेत. सध्या हा कारभार कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण हाकत आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर हे ३१ मे २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक उपअभियंता अनामिक जाधव हाकत आहे. महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता सोमनाथ रसाळ यांची कोल्हापूर येथे बदली होऊन वर्ष उलटले. त्यांच्या जाग्यावर नवीन अधिकारी देण्यात आलेला नाही. हा पदभार सावंतवाडी प्रकल्प संचालक विनीत म्हात्रे ये दुय्यम अधिकारी हाकत आहे. समाज कल्याण विभागाला जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून पद असते हे लोकांच्या विस्मृतीत गेले आहे. गेली अनेक वर्षे या पदावर हक्काचा अधिकारीच नाही. या पदाची सध्या संगीत खुर्ची सुरु आहे. सध्या हा पदभार सावंतवाडी सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक या दुय्यम असलेल्या अधिकाऱ्यांकडे आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण गेल्या वर्षभराहून अधिक कालावधी गायब आहेत. त्यांची नियुक्ती येथे दिसतेय. पण ते हजरच नाही. त्यांचा पदभार ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे हाकत आहेत.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ राजेंद्र लंघे यांची मे महिन्यात बदली झाली. त्यांच्या जाग्यावर शासनाने नवीन अधिकारी दिलेला नाही. त्यांचा पदभार डॉ विद्यानंद देसाई हाकत आहेत. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत बहुतांश अधिकारी पदाची वाणवा आहे. तुटपुंज्या अधिकाऱ्यांच्या जीवावर जिल्हा परिषद कारभार सुरु आहे. परिणामी कामकाजावर मर्यादा येत आहेत. गतिमान कारभाराला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे राज्य शासन लक्ष देणार का ? जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सत्ताधारी खासदार, आमदार याकडे काळजीपूर्वक पाहणार का ? निधी खर्चाची व जिल्ह्यातील नागरिकांना विकास देण्याची अपेक्षा ठेवताना किमान अधिकारी रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.