महामार्ग सुस्थितीत आणण्यासाठी जबाबदारी विनय देशपांडे समितीकडे

2

अतुल काळसेकर यांची कणकवलीत ग्वाही

कणकवली, ता. ०८ : कणकवलीत झालेल्या चिखलफेक आंदोलनाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. त्याअनुषंगाने हायवेचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, अधीक्षक अभियंता सलीम शेख यांची समिती बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गठीत केली आहे. कणकवली शहर तसेच ओरोस ते कुडाळ या दरम्यानचे खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली आहे. या कामावर देशपांडे यांची समिती दररोज लक्ष ठेवून असणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य अतुल काळसेकर यांनी दिली.
येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवा नेते संदेश पारकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, अमित आवटी आदी उपस्थित होते.
श्री.काळसेकर म्हणाले, कणकवलीकरांच्या उद्रेकाची आम्ही सहमत आहोत. जसे महामार्गाचे श्रेय आम्ही घेतो. तसेच जनतेला होत असलेल्या त्रासाचीही जबाबदारी घेऊन आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. महामार्ग लवकरात लवकर सुस्थितीत आणण्यासाठी बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल महामार्ग अधिकार्‍यांची बैठक घेतली. यात कणकवली शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाच्या देखरेखीची जबाबदारी महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे आणि अधीक्षक अभियंता सलीम शेख यांच्याकडे देण्यात आली आहे. आता पावसाची उघडीप मिळताच शहरातील महामार्ग डांबरीकरण केला जाणार आहे. सर्व्हिस रोडचे काम पूर्ण केले जाईल. तसेच महामार्गालगतचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला जाणार आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्तही घेतला जाणार आहे.

महामार्ग खड्डेमुक्तीबाबत मौन
खारेपाटण ते झाराप या दरम्यानचा महामार्ग खड्डेमुक्त असेल, महामार्गावरील सर्व समस्या आम्ही दूर करू अशी ग्वाही यापूर्वी देखील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली होती. तसेच पालकमंत्री, भाजप जिल्हाध्यक्ष यांनीही हायवे सुस्थितीत आणण्याची जबाबदारी घेतली. परंतु अद्यापही महामार्ग खड्डेमय आहे. तेव्हा महामार्ग खड्डेमुक्त केव्हा होईल? किती दिवसांत हे काम पूर्ण होईल? याबाबतच्या प्रश्‍नावर श्री.काळसेकर यांनी मौन बाळगणे पसंत केले.

19

4