रेल्वेमंत्र्यांचा हिरवा कंदिल : खासदार राऊत व पालकमंत्री केसरकर यांचा पाठपुरावा
सावंतवाडी, ता. ०८ : येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने गेले काही दिवस कोकण रेल्वे प्रशासनाच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनाला आज अखेर यश आले आहे. आज सावंतवाडीत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यास रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. यात मंगला एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, कोचुअल्ला एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा दिला जाणार आहे.
यासाठी पालकमंंत्री दिपक केसरकर यांच्यासह खासदार विनायक राउत यांनी प्रयत्न केले. याबाबतची माहिती जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी दिली.
गेले काही दिवस कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्यात यावा अशी मागणी घेवून कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा निर्णय या संघटनेच्यावतीने देण्यात आला होता. सावंतवाडी रेल्वेस्टेशनच्या बाहेर त्यांनी धरणे आंदोलन पुकारले होते. यावेळी त्याठिकाणी हा इशारा देण्यात आला होता. यावेळी त्या ठिकाणी भेट दिलेल्या पालकमंत्री केसरकर यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांना सांवतवाडीत थांबा देण्याचे मान्य केले होते.