नितेश राणे यांच्यासह सहकाऱ्यांना 23 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी

2

कणकवली,ता.०९: आमदार नीतेश राणेंसह सर्व 19 जणांना कणकवली न्यायालयाने 23 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर उद्या यासर्वांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास राणेंसह सर्व आंदोलकांना कणकवली न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन कामकाज सुरू झाले. यात सरकारी पक्षाने उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्याला आंदोलकांच्या वकिलांनी हरकत घेतली. या युक्तिवादानंतर सर्व आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
कणकवली गडनदी पुलावर हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर 4 जुलै रोजी चिखलफेक आंदोलन झाले होते. यात आमदार नीतेश राणेंसह 18 आरोपींना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्वांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज या सर्व आरोपींना कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यात सरकारी वकील अ‍ॅड.गजानन तोडकरी यांनी अन्य आंदोलक आरोपींना ताब्यात घ्यावयाचे असल्याने वाढीव पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली. तर अ‍ॅड.संग्राम देसाई, अ‍ॅड.राजेंद्र रावराणे, अ‍ॅड.उमेश सावंत यांनी याला हरकत घेतली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांनी मोबाईल, चिखल फेकलेल्या बदल्या, वाहने आदी जप्त केल्या आहेत. त्यामुळे वाढीव कोठडी मिळू नये असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्या.सलीम जमादार यांनी नीतेश राणेंसह सर्व आरोपींना 23 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर सर्व आंदोलकांच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून, त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
आमदार नीतेश राणेंसह इतर आंदोलकांना कणकवली न्यायालयात आणले जाणार असल्याने न्यायालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

24

4