कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम बोगस ; उच्चस्तरीय चौकशी व्हावी…

2

अधिकारी, ठेकेदार यांचे साटेलोटे त्यांना आमदारांचे आशीर्वाद ; अशोक सावंत यांचा आरोप

मालवण, ता. ९ : साडे आठ कोटी रुपये खर्चून दुरुस्ती केलेल्या कोळंब पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कामाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती नेमावी. क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी व्हावी तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये. अधिकारी, ठेकेदाराचे साटेलोटे असून त्यांना आमदार वैभव नाईक यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी येथे केला.
कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट असून पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता भराव टाकण्यात आला आहे. पुलाचे काम बोगस असल्याने याची माहिती माहिती अधिकारात मागितली आहे. या कामाची चौकशी झाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल देऊ नये यासाठी लवकरच जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी सांगितले.
कोळंब पुलाच्या दुरूस्तीच्यावेळी पुलालगतच मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला होता. पुलाच्या दुरुस्तीनंतर हा भराव काढून टाकायला हवा होता मात्र त्याची कार्यवाही झाली नाही. परिणामी खाडीपात्रातील पाणी लगतच्या गावांमध्ये घुसण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी याप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा दिला. या पार्श्‍वभूमीवर आज स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, बाबा परब, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, संदीप भोजने, विराज तळाशिलकर, कृष्णनाथ तांडेल यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी कोळंब पुलासह तेथे टाकलेल्या भरावाची पाहणी केली.
यावेळी पुलाच्या शिगांना लावलेले सिमेंट, प्लास्टर पावसात कोसळून पडल्याचे दिसले. काही भागात तर सिमेंटच्या पिशव्या केलेल्या प्लास्टरमध्येच असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोळंब पुलाचे काम बोगस झाले असल्याचा आरोप स्वाभीमानच्या पदाधिकार्‍यांनी केला. कोट्यवधी रुपये खर्च करून झालेली दुरुस्ती ही बोगस असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बांधकाममंत्री श्री. पाटील यांनी या कामाच्या दर्जाबाबत उच्चस्तरीय चौकशी नेमून आवश्यक ती कार्यवाही करावी तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये असे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले. पुलालगतचा भराव न काढल्याने परिसरातील दहा ते पंधरा गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा भराव तत्काळ न हटविल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
पुलालगत भराव टाकताना पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र परवानगी न घेताच भराव टाकला आहे. त्याठिकाणीची काही कांदळवनेही भरावाखाली गेल्याने पर्यावरणाचा र्‍हास झाला आहे. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी झाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करू नये यासाठी येत्या दोन दिवसात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे श्री. केणी यांनी सांगितले. पुलाची चाचणी घेतल्यानंतर केवळ २० टनापेक्षा जास्त अवजड वाहने जाणार नसल्याचे स्पष्ट केले गेले. त्यामुळे पुलाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला असल्याचे श्री. केणी यांनी सांगितले.

3

4