अखेरच्या क्षणापर्यंत लढणार; प्रकल्पग्रस्तांची प्रतिक्रिया
वैभववाडी/पंकज मोरे आधी पुनर्वसन मग धरण’ हे शासनाचे धोरण धाब्यावर बसवत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व मोबदला वाटप पूर्ण नं करताच अरुणा प्रकल्पाच्या घळभरणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. प्रशासनाने पुनर्वसन न करताच प्रकल्पाची घळभरणी पोलिस बंदोबस्तात केली. त्यामुळे आम्ही उध्वस्त झालो. मात्र आम्ही अखेरच्या क्षणापर्यंत प्रशासनाच्या विरोधात लढणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तांनी ‘ब्रेकिंग मालवणी’ कडे मांडल्या.
अरुणा प्रकल्पाची घळभरणी करताना ग्रामपंचायतीलाही विश्वासात न घेता रातोरात मुख्य रस्ता बंद करुन ग्रामस्थांच्या विरोधाला धुडकावून लावत पोलिस बंदोबस्तात घळभरणीचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण केले आहे. आणि आता प्रकल्पग्रस्तांना पत्रा शेडमध्ये जाण्यासाठी हुसकावून लावले. तिथे अद्यापही वीज, पाणी या मूलभूत सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत.
पुनर्वसनमध्ये १८ नागरी सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र अद्याप या सुविधा देण्यात आल्या नाही. प्रकल्पग्रस्तांना मिळालेला मोबदला तुटपुंजा असून तोही अद्याप मिळालेला नाही. भूखंड वाटप, पर्यायी शेत जमिन देण्यात आलेली नाही. पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रकल्पग्रस्तांचा असंतोष वाढत आहे.
_…..तर पाण्यातच राहणार- प्रकल्पग्रस्त विलास कदम_
प्रकल्पग्रस्त विलास कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, कणकवली येथे आज प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत मयत वारसांची नोटीस तपासून चार दिवसात देतो असे प्रांताधिका-यांनी सांगितले. तसेच याबाबत उर्वरीत चर्चा शुक्रवारी करणार आहेत. प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्यामध्ये गेली आहेत. त्या घरांची नुकसान भरपाई मिळावी. तसेच मयतांच्या वारसांना भूखंड मिळण्याबाबत चर्चा होणार आहे. प्रकल्पग्रस्तांना शेड नको आहे. याबाबतही चर्चा होणार आहे. तसेच वरील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आम्ही पाण्यातच राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.