मराठा समाज महामार्गासाठी जेलभरोत सहभागी होणार…

2

मराठा समाज नेते एस.टी सावंत यांची माहीती ;आमदार नीतेश राणे यांचे आंदोलन योग्य,सूडबुद्धीने त्रास देणार्‍या यंत्रणेचा केला निषेध

कणकवली, ता.10 : मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम करत असताना महामार्ग प्राधिकरण अधिकारी, ठेकेदार कंपनीकडून योग्य नियोजन न केल्यामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जनतेला या रस्त्यावरून ये-जा करताना मोठा त्रास होत आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी जागृत आ. नीतेश राणे यांनी आंदोलन केले. या आंदोलनात सूडबुद्धीने आ.नीतेश राणेंसह सहकार्‍यांना त्रास देण्याचे काम सरकारने केले आहे. आ. नीतेश राणेंच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. 16 जुलै रोजी होणाजया जेलभरोत मराठा समाज मोठया संख्येने सहभागी होईल, अशी माहीती मराठा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष एस.टी.सावंत यांनी दिली.
कणकवली येथील मराठा मंडळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरक्षण समितीचे उपाध्यक्ष लवू वारंग, शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमा गायकवाड, मराठा क्रांती महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुशील सावंत, तालुकाध्यक्ष समीर सावंत, सोनू सावंत, नगरसेवक महेंद्र सांबरेकर, एन.बी.सावंत आदींसह मराठा समाज पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवलीत मुख्य रहदारी असतानादेखील नियोजन शून्य कारभारामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे. हात पाय तुटेपर्यंत, लोक मरेपर्यंत संबंधित महामार्ग प्राधिकरणाने दुरवस्थेकडे दुर्लक्ष केला. अनेक प्रकल्पग्रस्त, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदने देवून देखील समाधानकारक कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे संवेदनशील आ. नीतेश राणे यांनी स्वत: मुख्यचौक ते गडनदीपर्यंत पाहणी केली. रस्त्याची अवस्था पाहून जनतेच्या सुखासाठी अधिकार्‍यांवर चिखल टाकला. लोकप्रतिनिधी म्हणून उठविलेल्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न अधिकार्‍यांनी केला आहे. त्यांचा अटकेचा जाहीर निषेध करून 16 जुलैच्या जेलभरो आंदोलनाला मराठा समाज आणि डंपर व्यवसायिकांच्यावतीने आम्ही पाठिंबा जाहीर करत असल्याचे
एस.टी.सावंत यांनी सांगितले.

जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न-सोमा गायकवाड
जनतेचे प्रश्न आवाज उठविताना आ. नीतेश राणेंसह कार्यकर्त्यांना सत्ताधार्‍यांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली त्याचा निषेध करतो. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच ही अवस्था महामार्गाची झालेली आहे. कणकवली शहरात सर्व्हिस रस्ते करण्यापूर्वी महामार्ग ठेकेदाराने स्वत:च्या फायद्यासाठी पिलरची उभारणी केली. मात्र खर्‍या अर्थाने जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आला. महामार्ग अधिकारी प्रकाश शेडेकर यांच्या चुकीच्या पद्धतीच्या कामांमुळे आंदोलन भडकले. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नीतेश राणेंवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशा सूचना केल्याचे वक्तव्य केले. त्याचा निषेध करतो. सत्ताधार्‍यांचा एकतर्फी ठेकेदाराला पाठिंबा आहे. आंदोलन थांबविण्यासाठी केलेली कारवाईचा आम्ही निषेध करतो, असे शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सोमा गायकवाड यांनी सांगितले.

नीतेश राणेंचा जाहीर सत्कार करणार-लवू वारंग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा एकमेव मराठा आमदार नीतेश राणे यांच्या रूपाने आम्हाला मिळाला आहे. समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने नीतेश राणे यांची लढाई असते. पोलिसांनी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री केसरकरांनी पोलिसांना पुढे करून आमदारांवर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेसाठी लढणार्‍या नीतेश राणेंचा आम्ही मराठा समाजाच्यावतीने जाहीर सत्कार करणार असल्याचे मराठा आरक्षण समितीचे उपाध्यक्ष लवू वारंग यांनी जाहीर केले.

रस्त्यावर गणपती पूजन करून आंदोलन करु- सुशील सावंत
दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडून सिंधुदुर्गवासियांवर अन्याय करण्याचे काम करण्यात येत आहे. गोव्यात याच कंपनीचे काम सुरळीत सुरू आहे. मग सिंधुदुर्गात ही परिस्थिती कशाला? फक्त नीतेश राणे जनतेचा आवाज ओळखून आंदोलन करतात तो आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून सुरू आहे. पालकमंत्र्यांनी मनुष्यवधाचा ठेकेदारावर दाखल करावा. येत्या गणेश चतुर्थीत मोठया प्रमाणात चाकरमानी सिंधुदुर्गात येतात तत्पूर्वी वाहतुकीस रस्ता सुरक्षित न झाल्यास रस्त्यावर गणपतीचे पूजन करून लोकशाही पद्धतीने आंदोलन करु असा इशारा मराठा क्रांती महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुशील सावंत यांनी दिला.

12

4