पक्षासाठी कुणी दोन तास देखील द्यायला तयार नाही

203
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची खंत : कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी मरगळ झटकण्याची गरज

कणकवली, ता.10 : पक्ष कार्यासाठी दिवसातून दोन तास कोण कोण वेळ देणार? असा प्रश्‍न केल्यानंतर फक्त तिघांचे हात वर झाले. यातील एकानेच सकाळच्या सत्रात काम करणार असल्याचे सांगितले. तर दुपारी, सायंकाळी, रात्री काम करण्यासाठी एकाही हात वर झाला नाही. एवढंच नव्हे तर मतदार नोंदणी कशी करायची याचीही माहिती कुणाला नाही ही खरोखरच धक्कादायक बाब आहे. इतर मतदारसंघात 10 ते 15 हजारापर्यंत पक्षसदस्य नोंदणी झाली. कणकवलीत तर सुरूवातही झालेली नाही. अशा कामाने पक्ष संघटना वाढणार नाही. भाजपचा आमदार देखील निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांसह भाजपच्या सिंधुदुर्गातील नेतेमंडळी आणि पदाधिकार्‍यांनीही मरगळ झटकून काम करण्याची गरज आहे असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात भाजपचा बुथप्रमुख मेळावा झाला. यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. याखेरीज प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, प्रज्ञा ढवण, जयदेव कदम, प्रमोद रावराणे आदी पदाधिकार्‍यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
श्री.चव्हाण म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाशी युती होईल किंवा होणार देखील नाही. मात्र प्रत्येक कार्यकर्त्याने स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असायला हवे. त्यासाठी कणकवली तालुक्यात किमान 25 हजार सदस्य जोडायला हवेत. प्रत्येक बुथप्रमुखाने 100 सदस्य नोंदणी करायलाच हवी. तरच आपण या मतदारसंघात भाजपचे आव्हान निर्माण करू शकणार आहोत.
ते म्हणाले, मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आकर्षण आहे. त्यांच्या कामाची पद्धत आणि आवाका सर्वसामान्यांना माहिती आहे. पण या मतदारापर्यंत कार्यकर्त्यांनी पोचणे आवश्यक आहे. नेमके तेच इथे होताना दिसत नाही. आता पक्ष संघटनेसाठी दिवसातून किमान दोन तास तरी योगदान द्यायला हवे. केवळ सदस्य नोंदणी करून थांबून चालणार नाही. तर प्रत्येक कार्यकर्ता हा पुढील काळात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असायला हवा. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच झटून काम करायचे आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले, मोदी पुन्हा निवडून येणार नाहीत असा सूर आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी लावला होता. पण पक्ष सदस्य नोंदणीच्या पाठबळावर देशात भाजपची पुन्हा सत्ता आली आणि मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले. त्याचधर्तीवर आपणाला आगामी विधानसभेसाठी काम करायचे आहे. त्यासाठीचे नियोजन आत्तापासूनच करा. बुथप्रमुख आणि कार्यकर्त्यांप्रमाणे भाजपच्या जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकार्‍याने देखील शांत बसून चालणार नाही. तर प्रत्येक मतदारापर्यंत पोचायला हवे. विधीमंडळाचे शेवटचे अधिवेशन नुकतेच झाले. यात विरोधी मंडळी कुठेही आक्रमक झालेली दिसून आली नाहीत. त्यांची सत्ता येणार नाही हे त्यांनाही माहिती असल्याने ते गलितगात्र झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फक्त प्रामाणिकपणे जरी काम केले तरी मतदारसंघात भाजपचा झेंडा निश्‍चितपणे फडकेल असेही श्री.चव्हाण म्हणाले.
संदेश पारकर म्हणाले, कणकवली विधानसभेवर आता भाजपचाच झेंडा फडकणार आहे. इथल्या जनतेचे पाठबळ आपल्या बाजूने आहे. इथल्या जनतेला गुंडगिरी नकोय तर विकास हवा आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागा. विधानसभेत भाजप उमेदवाराचाच विजय पक्का आहे.
अतुल काळसेकर यांनी मोदी सरकारची प्रत्येक योजना मतदारापर्यंत पोचवा. उज्वला गॅस व इतर योजनांची संपूर्ण माहिती द्या. प्रत्येक गरजवंताला सहकार्याचा हात द्या असे आवाहन केले. तसेच प्रत्येक बुथ प्रमुख किमान 100 लोकापर्यंत पोचला तरी सिंधुदुर्गात भाजप पक्ष संघटना मजबूत होईल. त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे असेही आवाहन भाजप पदाधिकार्‍यांनी केले

\