आम. वैभव नाईक यांनी विकासकामांतून मतदार संघाचा कायापालट केला :अरुण दुधवडकर

191
2
Google search engine
Google search engine

मुंबईत कुडाळ मालवणमधील मुंबईस्थित चाकरमाऱ्यांचा मेळावा…

मालवण, ता १० : २०१४ च्या निवडणूकीत आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव करून शिवसेनेचा भगवा फडकवला. जनतेच्या विश्वासास पात्र ठरत श्री. नाईक यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट केला. त्यामुळे राणेंचे सिंधुदुर्गातील अस्तित्व संपुष्टात आले. शिवसेनेची कोकण व सिंधुदुर्गाशी नाळ जोडली आहे. येत्या विधान सभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा कुडाळ मालवण गड अबाधित राखून तिन्ही विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवून राणेंचे उरलेसुरले अस्तित्व संपविण्यासाठी मुंबईस्थित चाकरमान्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले
शिवसेनेच्यावतीने कुडाळ मालवण तालुक्यातील मुंबईस्थित शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मंडळांचे पदाधिकारी व मुंबईतील चाकरमान्यांचा मेळावा शिवसेना भवन दादर मुंबई येथे झाला. यावेळी कुडाळ मालवण मतदार संघातील मुंबईस्थित चाकरमानी उपस्थित होते. व्यासपीठावर मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर, आमदार वैभव नाईक, जिल्हा पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, निरीक्षक अंनत भोसले, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश पाटील, महिला संपर्क प्रमुख सूचिता चिंदरकर, ज्येष्ठ महिला शिवसैनिक माई परब, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. बोरकर म्हणाले, विधानसभेवर भगवा फडकविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक योगदान देत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र ही संकल्पना मांडली असून ही संकल्पना यशस्वी करायची आहे. यासाठी सिंधुदुर्गातील मुंबईवासीयांची साथ गरजेची आहे.
श्री. म्हाडेश्वर म्हणाले, वैभव नाईक हे सिंधुदुर्गचे वैभव आहे. शिवसेनेच्या पडत्या काळात आमदार नाईक यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करत जुन्या निष्ठावंत शिवसैनिक व मुंबईतील चाकरमान्यांच्या मदतीने शिवसेनेला पुन्हा सिंधुदुर्गात भरारी दिली. आम. नाईक यांनी जिल्ह्यात विकासाची गंगा आणत विकासकामे मार्गी लावली. जिल्ह्यातील विविध प्रश्न विधिमंडळात हिरहिरीने ते मांडत आहेत. कुडाळ मालवणच्या भवितव्यासाठी वैभव नाईक हेच आमदार हवेत. कुडाळ मालवणच्या जनतेच्या आशिर्वादाने श्री. नाईक हे पुन्हा निवडून येऊन मंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. नाईक म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोकणासाठी भरीव योगदान दिले आहे. सर्वसामान्यांना विविध पदे देत कोकणी माणसाचा सन्मान केला. निवडणुकीसाठी, प्रचारासाठी, संघटना बांधणीसाठी मुंबईतील चाकरमान्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपले हे योगदान आम्ही कधीही विसरणार नाही. जिल्ह्यातील तीनही मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि हीच खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल. पक्षप्रमुख ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह साजरा होणार आहे. यानिमित्ताने १७ जुलै ते २७ जुलै या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना मुंबईतस्थित चाकरमान्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.