बांदा-आंबोली राज्य मार्गावरील सरमळे येथील पूल पाण्याखाली

2

ओटवणे,ता.११ : सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून,बांदा-आंबोली राज्य मार्गावरील सरमळे येथील पूल पाण्याखाली गेल्याने बांदा तसेच आंबोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
गेले दोन दिवस तुफान पाऊस कोसळत असून,सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीचे दुथडी भरून वाहत आहेत.तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तेरेखोलची उपनदी असणाऱ्या दाभील नदीवरील सरमळे येथील पूल गुरुवारी तुफान पावसामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला.बांदा-आंबोली राज्य मार्गावरील हा महत्वाचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली.लगतच्या ओटवणे,विलवडे, बांदा,दाणोली,आंबोली या गावांचा संपर्क तुटला आहे.
राज्यमार्गावरील हा पूल अतिशय कमी उंचीचा असून,पावसाळ्यात अनेकदा हा पूल पाण्याखाली असतो,त्यामुळे वर्दळीच्या या राज्यमार्गावरील वाहतूक अनेकदा बंद असते.काही वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने एक कॅटर पुलावरील पाण्याच्या प्रवाहाने तेरेखोल नदीत वाहून गेला होता.या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सतत होत आहे.

4