शिक्षण समिती सभेत आंबोकर यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी ता.११:
राज्यभरात एकाचवेळी झालेल्या शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ पास झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्याचे काम शिल्लक आहे, अशी माहिती बुधवारी दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक विद्यालय मांगेली येथे झालेल्या शिक्षण समिती सभेत प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली. सिंधुदुर्गात केवळ पदवीधर शिक्षक पदासाठी हि भरती झाली आहे. शासनाने नव्याने भरती झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी यावेळी सभागृहाने केली.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक समितीची वर्षातील एक मासिक सभा ग्रामीण भागात घेण्यात येते. शिक्षण सभापती डॉ अनिशा दळवी यांनी जुलै महिन्याची सभा आपल्या मतदार संघातील मांगेली येथे आयोजित केली होती. यावेळी सदस्य उन्नती धुरी, सरोज परब, संपदा देसाई, राजन मुळीक, विष्णुदास कुबल, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह मांगेली सरपंच सुनील गवस, दोडामार्ग माजी उपसभापती सुनंदा धर्णे, प्रशाला मुख्याध्यापक आनंद नाईक व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे वृक्षरोप देऊन स्वागत करण्यात आले. तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ कोणाळकट्टा संचालित माध्यमिक विद्यालय मांगेली येथे हि सभा संपन्न झाली.
यावेळी शालेय क्रीडा स्पर्धा व यासाठी सराव घेताना जखमी होणाऱ्या मुलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांदा केंद्र शाळेत ३५० मुले असताना मुख्याध्यापक मिळत नसल्याचो खंत उन्नती धुरी यांनी व्यक्त केली. गेळे येथे प्राथमिक शाळेजवळ जिल्हा परिषदेच्या मालकीची ३० एकर जागा आहे. त्यातील एक एकर जागा जिल्हा परिषदेला ठेवून बाकीची जागा शासनाला हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे यावेळी आंबोकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सभागृहाने जिल्हा परिषदेच्या मालकीची एक इंचही जागा शासनाला देण्यास विरोध दर्शविला.
वेंगुर्ले तालुक्यातील खानोली हि एकच ग्राम पंचायत होती. तिचे विभाजन होऊन खानोली व वायंगणी अशा दोन ग्राम पंचायती झाल्या. मात्र ग्राम पंचायत इमारत वायंगणी ग्राम पंचायतीला गेली. त्यामुळे खानोलीसाठी इमारत नाही. खानोली येथे शाळेची एक इमारत आहे. हि इमारत ग्राम पंचायतीला द्यावी, अशी मागणी विष्णुदास कुबल यांनी केली. यावेळी सभागृहाने त्याला मान्यता दिली. एक दिवस शेतीसाठी हा उपक्रम केवळ एका दिवसासाठी नसून एका शैक्षणिक वर्षात पाच दिवस हा उपक्रम प्रत्येक शाळेने आप-आपल्या नियोजनानुसार राबवावा, असे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
आजगांव येथे स्वतंत्र किचन शेड असताना पोषण आहार शिजविणाऱ्या महिला घराकडून शिजवून असतात. या महिलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे राजन मुळीक यांनी सांगितले. त्यावर सभापती डॉ अनिशा दळवी यांनी येत्या आठ दिवसात पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांच्या आरोग्य तपासणीचा अहवाल आपल्याला द्यावा, असे आदेश दिले. २०१९-२० या आर्थिक वर्षात अनेक वर्षांनंतर समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात १४० शाळांच्या दुरुस्त्या मंजूर झाल्या आहेत, असे आंबोकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मुलांच्या गणवेशाचा एकच रंग
जिल्हा परिषद शाळांतील मुलांचा गणवेशाचा पुढील शैक्षणिक वर्षांपासून एकच रंग ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एक दिवस शेतीसाठी प्रमाणे प्रत्येक शाळेत परसबाग स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुलांना कार्यानुभव अनुभव घेता येईल. तसेच भाजीपीक उत्पादन कसे घेतात ? याचे महत्व कळेल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सभापती डॉ सौ दळवी यांनी, शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी नवीन हेड निर्माण करण्याची तसेच शाळा इमारतींचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास आपत्कालीन निधी देण्यास हेड सुरु करण्याचा ठराव घेतला.