कणकवलीत मांडली भूमिका;जेलभरो आंदोलनाला आमचा पाठींबा नाही…
कणकवली, ता.११: सिंधुदुर्गातील सकल मराठा समाज कोणत्याही एका पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाची भूमिका जाहीर करण्याचा अधिकार स्वाभिमान पक्षातील मराठा समाज पदाधिकार्यांना नाही.जेलभरो आंदोलनात सहभागी होण्याचा कालच्या पत्रकार परिषदेत स्वाभिमान पक्षाच्या लोकांनी जाहीर केलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तीक निर्णय असुन त्याच्याशी सकल मराठा समाज बांधिल नाही अशी भुमिका मराठा सेवासंघाचे अध्यक्ष डॉ.तुळशीराम रावराणे व मराठा समाजाचे कणकवली तालुका संयोजक सुहास सावंत यांच्यासह मराठा समाज बांधवांनी मांडली.
कणकवली येथील मराठा मंडळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाज बांधवानी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुळशीराम रावराणे, सुहास सावंत, सुशांत नाईक, शेखऱ राणे, बबलु सावंत, महेश सावंत, समर्थ राणे, बच्चु प्रभुगांवकर, भास्कर राणे, संदेश पटेल, दिपक सांडव, विजय चिंदरकर, सदानंद चव्हाण, संतोष पुजारे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना बबलु सावंत म्हणाले, सकल मराठा समाज जेलभरो आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे. मात्र ही कृती चुकीची असुन सकल मराठा समाज कोणत्याही एका पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही. व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे समाज निर्णय घेईल.
यावेळी बोलताना डॉ.तुळशीराम रावराणे म्हणाले, हायवे प्रश्नाबद्दल चिखलफेक आंदोलन झाल्यानंतर स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केवळ आम. नितेश राणे यांना खुष करण्यासाठी कालचा पाठींब्याचा प्रकार केला आहे. वास्तविक नगरपंचायत स्वाभिमान पक्षाकडे असल्याने हायवे प्रश्नाबाबत त्यानी दखल घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता सकल मराठा समाजाला गृहीत धरण्याचा प्रकार केला असुन वास्तविक आम्हाला कालच्या भूमिकेबाबत कल्पना देणे आवश्यक होते परंतु तसे घडलेले नाही. त्यामुळे या आंदोलनाला आमचा पाठींबा नसुन सकल मराठा समाजात सर्व पक्षाचे पदाधिकारी असुन यामध्ये लोकप्रतनिधींचाही समावेश आहे. त्यामुळे या आंदोलनात सकल मराठा समाजाला वेठीस धरुनये आणि या आंदोलनाची आमचा संबंध नसल्याचे डॉ.तुळशीराम रावराणे म्हणाले.
यावेळी बोलताना सुशांत नाईक म्हणाले, मराठा समाजाचा पदाधिकारी झाला म्हणुन लोक पाठीशी राहतील असे समजु नये. कालची पत्रकार परिषदही स्वाभिमान पक्षातील मराठा बांधवानी घेतली होती. आम.नितेश राणे यांना खुष करण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्याच लोकांनी या पत्रकार परिषदेत भूमिका मांडुन निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन हा पाठींब्याचा निर्णय जाहीर केला असुन याच्याशी सकल मराठा समाज बांधवांचा संबंध नसल्याचे सांगितले
तर महेश सावंत म्हणाले,मराठा समाज बांधव समाज हिताच्या कार्यात नेहमीच एकत्र राहीला आहे. चिखलफेक आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी पाठींब्याचा निर्णय दिला असेल तर या निर्णयाशी आमचा काडीमात्र संबंध नाही. गोरगरीबांच्या हितासाठी हे आंदोलन असते तर आम्ही सहभाली झालो असतो असे ते म्हणाले.
सुहास सावंत म्हणाले, मी म्हणजे मराठा समाज असे कुणी समजु नये. मराठा समाजाला कोणत्याही पक्षाचे लेबल लावु नका तर चांगल्या गोष्टीमध्ये मराठा समाज हा नेहमीच एकत्र राहील परंतु कोणत्यातरी पक्षासाठी समाज बांधवाना वेठीस धरुनका असेही यावेळी सावंत म्हणाले.