राणेंच्या चिखलफेक आंदोलनाचे पंचायत समितीकडून समर्थन….

212
2
Google search engine
Google search engine

अटकेच्या कारवाईचाही सभेत निषेध:अधिका-यांनी लोकांसाठी काम करावे

कणकवली, ता.११ : आमदार नीतेश राणे यांचे आंदोलन जनतेच्या प्रश्‍नासाठी होते. या आंदोलनप्रश्‍नी त्यांना झालेली अटक निषेधार्ह असल्याची भावना आज कणकवली पंचायत समिती सदस्यांनी सभेत व्यक्त केली. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येते. पण तेच अधिकारी जर जनतेला वेठीस धरत असतील तर चिखलफेकीसारखी आंदोलने होतच राहणार आहे. मात्र अशा आंदोलनाच्या निमित्ताने सरकार लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करतात. त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करतात हे लोकशाहीचा धरून नाही असेही मत पंचायत समिती सदस्यांनी आज व्यक्त केले.

कणकवली पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज सभापती सुजाता हळदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, उपसभापती सुचिता दळवी, तसेच सदस्य उपस्थित होते. आजच्या सभेच्या सुरवातीला गैरहजर अधिकार्‍यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी विभाग, सहाय्यक निबंधक, एसटी, अशा विविध खात्याचे अधिकारी गैरहजर होते. पावसाळ्यात अनेक समस्या आहेत. जनतेला त्रास होत आहे. याबाबत कुणाला जाब विचारायचा, उत्तर कोण देणार, लोकप्रतिनिधी वेळ वाया घालवायला येतात का, हा आमचा अवमान आहे. महिन्यातून एकदा सभा होते पण अधिकारीच गैरहजर राहतात. मग सभेला अर्थ काय असे प्रश्‍न सदस्य मनोज रावराणे, प्रकाश पारकर, गणेश तांबे यांनी उपस्थित केले.