कणकवली, ता.११ : मनसेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी पिसेकामते बिडवाडी रस्त्याच्या कामाची पाहणी करून काम निकृष्ट असल्याचे सांगत ते बंद करण्याची धमकी दिली. तसेच काम चालू करावयाचे झाल्यास एक लाखाच्या खंडणीची मागणी केल्याच्या आरोपातून श्री. भोगले याची येथील सह प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. बी. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
शासकीय ठेकेदार रामदास विखाळे यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आचरा मुख्य रस्ता ते पिसेकामते बिडवाडी या 1200 मिटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा ठेका मिळाला होता. त्यांनी सदरचे काम 22 मार्च 2016 पासून सुरू केले होते. दरम्यान 6 एप्रिल 2016 रोजी रस्त्याच्या ठिकाणी असलेला कामगार शिवाजी चौगुले यांनी श्री. विखाळे यांना कळविले की, ‘मनसेचे जिल्हाप्रमुख शैलेश भोगले यांनी कामाचे फोटो काढून काम बोगस असल्याचे सांगून ते सुरू करावयाचे झाल्यास 1 लाख रुपये मागितले.’ त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे ठेकेदार व श्री. भोगले यांची बैठक झाली व शाखा अभियंत्यांसोबत जाऊन कामाची पाहणी करण्यात आली. मात्र, तरीही कामावरील मुकादमाकडे फोन करून भोगले यांनी पैशाची मागणी केल्याने श्री. विखाळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानुसार आरोपीविरुद्ध भादंवि कलम 384 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, मागणी केल्याबाबतचा कोणताही विश्वासार्ह पुरावा न आल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. श्री. भोगले हे आता शिवसेना पक्षात कणकवली तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.