कणकवली रोटरी क्‍लब अध्यक्षपदी दिशा अंधारी तर सचिवपदी लवू पिळणकर

362
2
Google search engine
Google search engine
Google search engine

खजिनदारपदी रवी परब ः 13 जुलै रोजी पदग्रहण सोहळा

कणकवली, ता.११ : रोटरी क्‍लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षपदी सौ. दिशा दीपक अंधारी यांची निवड करण्यात आली असून त्या रोटरी क्‍लबच्या बाराव्या अध्यक्ष ठरल्या आहेत. सचिवपदी लवू पिळणकर तर खजिनदारपदी रवी परब यांची निवड झाली असून नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा शनिवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वा. चौंडेश्‍वरी हॉल, गणपती साना कणकवली येथे होणार आहे. पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा गव्हर्नर संग्राम पाटील व असिस्टंट गव्हर्नर मेघा गांगण उपस्थित राहणार आहेत.
रोटरी क्‍लब ऑफ कणकवली सेंट्रलच्यावतीने येथील हॉटेल साईपॅलेस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याची माहिती देण्यात आली. नूतन अध्यक्षा सौ. दिशा दीपक अंधारी, सेके्रटरी लवू पिळणकर तसेच अ‍ॅड. दीपक अंधारी, दिपक बेलवलकर, दादा कुडतरकर, रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर सौ. मेघा गांगण तसेच उमा परब, राजश्री रावराणे, धनंजय कसवणकर, संतोष कांबळी, रवींद्र मुसळे, भेराराम राठोड, मोहिनी राठोड, सोनू मालविय आदी रोटरीयन्स उपस्थित होत्या.
रोटरी क्‍लब ऑफ कणकवली सेंट्रलच्यावतीने पुढील वर्षभरात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती नूतन अध्यक्ष दिशा अंधारी यांनी दिली. रोटरी क्‍लब व विवेकानंद नेत्रालय यांच्यावतीने डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे 500 नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. तसेच 10 ते 15 ऑगस्ट या कालावधीत बेसिक किचन कोर्स आयोजित करण्यात आला असून 15 ऑगस्ट रोजी पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे. रोटरीच्या माध्यमातून अवयवदान, नेत्रदान चळवळीला गती दिली जाणार आहे. दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, चर्चासत्र तसेच लहान मुलांसाठी हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. थोर व्यक्‍तींची जयंती, पुण्यतिथी तसेच कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. अंध, अपंग व मतिमंदांसाठी विशेष उपक्रम घेतले जाणार आहेत. महिलांसाठी आरोग्य शिबीरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा तसेच विविध क्षेत्रातील मंडळीसाठी उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती सौ. दिशा अंधारी यांनी दिली.
समाजसेवेत अग्रेसर असलेल्या मंडळींचा रोटरीच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये विशेष सत्कार होणार आहे. तसेच कणकवली तालुका पत्रकार संघ व विविध संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. रोटरीच्यावतीने पेशंट बँक हा नाविन्यपूर्ण उपक्रम येत्या काळात राबविला जाणार आहे. त्यामध्ये गरजू रूग्णांसाठी व्हिलचेअर, वॉटरबेड आदी साहित्य अत्यल्प शुल्क घेत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या नागरिकांकडे असे साहित्य घरी वापराविना पडून आहेत ते या पेशंटबँक मध्ये जमा करावयाचे आहे. पेशंटबँकच्या माध्यमातून हे साहित्य गरजू रूग्णांना वापरा आणि परत करा अशा पध्दतीने उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती सौ. दिशा अंधारी यांनी दिली.

\