वाहतूक खोळंबली: भंगारवाडी पाणी घरात घुसल्याने नुकसान…
बांदा ता.११: येथील सटमटवाडी येथील टोलनाक्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने नाल्याच्या तोंडावरच बांधकाम केल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर आज पाणीच पाणी झाले.तर परिसरात असलेल्या भंगार वस्तीत पाणी घुसले.आज बांदा शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले.
मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल गुडगाभर पाणी आले होते. त्यामुळे दुपारी महामार्गाच्या दुतर्फा दोन तास वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. बांदा शहरातही आळवाडी बाजारपेठ व निमजगा येथील भंगार वस्तीत पाणी घुसले होते. तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेर्ले येथील जुने कापई पूल पाण्याखाली गेले होते. बांदा-वाफोलि रस्त्यावरील पाटकर बागेजवळील पूल देखील पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक दिवसभर बंद होती. परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र कुठेही नुकसानीची नोंद नसल्याचे महसूल विभागाने सांगितले.