सिंधुदुर्गनगरी, ता. १२ : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि महामार्गाचे काम या पार्श्वभूमीवर महामार्गावरील धोकादाय ठिकाणी तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार महामार्गावरील धोकादायक ठिकाणे व खराब काम असलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. याठिकाणी अपघात होऊ नयेत व दुचाकी चालकांना सहकार्य करण्यासाठी पोलीसांची गस्त तैनात करण्यात आली आहे.
तसेच महामार्गावरील अपघात रोखणे व वाहतुक नियमांच्या अंमलबजावणीसाठी महामार्गावर पोलिसांकडून मद्य प्राशन करून वाहन चालवणे, सिटबेल्टचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षीत राहण्यासाठी व वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊन अपघात होऊ नये व अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठीही पोलिस गस्त ठेवण्यात आली असल्याचे प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र, कणकवली, कसाल हे कळवितात. सध्या पावसाळा सुरू असल्याने व महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहन चालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.