सिंधुदुर्गनगरी, ता. १२ : जिल्ह्यातील 100 टक्के शिधापत्रिका धारकांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्याविषयी दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये विशेश अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केवळ केरोसिनचा लाभ घेणाऱ्या तसेच केरोसिन व गॅस दोन्हीचा लाभ न घेणाऱ्या बिगर गॅस जोडणी शिधापत्रिका धारकांना प्राधान्यांने गॅस जोडण्या मंजूर करण्यात येणार आहेत. सदर शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह भरून घेतले जाणर आहेत. त्या अनुषंगाने सर्व रास्त भाव दुकानदार व केरोसिन विक्रेत्यांनी हमीपत्र शिधापत्रिकाधारक यांच्याकडून रेशनकार्ड, रेशनकार्डमधील सदस्यांचे आधारकार्ड झेरॉक्स, कुटुबांतील प्रमुख महिला सदस्यांचे बँक पासबूक इत्यादी कागदपत्रे जमा करावयाची आहेत. कागदपत्रे जमा केल्यानंतर गॅस एजन्सीजकडून सदर शिधापत्रिकाधारकांना गॅस जोडणी देण्याविषयी कार्यवाही करण्यात येणार आहे.
तहसिलदार कार्यालयांकडून करण्यात येणाऱ्या हमीपत्रांच्या तपासणीमध्ये शिधापत्रिकाधारकाच्या घरात गॅस जोडणी असूनही हमीपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा शिधापत्रिकाधारकांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 व भारतीय दंड संहितेतील तरतुदींनुसार शासनाची फसवणूक केल्याबाबत व अनुदानिक केरोसिनचा गैरव्यवहार केल्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे हे कळवितात.
तसेच या अभियानामध्ये पात्र कुटुबांना 100 टक्के धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने धान्य दुकानांमधील पात्र लाभार्थ्यांची यादी दुकानाच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांमध्ये अन्न सुरक्षा योजनेच्या लाभाविषयी जागरुकता पसरवून पात्र कुटुंबांमधून अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रे जसे की शिधापत्रिका सत्यप्रत, शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची सत्यप्रत, कुटुंब प्रमुख यांचे बँक पासबूकच्या पहिल्या पानाची सत्यप्रत तसेच मोबाईल क्रमांक, गॅस धारक असलेस गॅसबूकच्या पहिल्या पानाची सत्यप्रत जमा करून धान्य दुकानांमध्ये तसेच तहसिल कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. जेणेकरून निवड झालेल्या शिधापत्रिकाधारकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने करणे सुलभ होईल. तरी या अभियानामध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.