मालकिचा वाद मिटता मिटेना : वनअधिकार्यांच्या चर्चेनंतर तात्पुरता निर्णय
सावंतवाडी, ता.१२: आंबोली धबधब्यावरील करवसुलीवरून निर्माण झालेला वाद काहीकेल्या मिटण्यास तयार नाही. पारपोलीसह चौकुळ व आंबोली या तिन्ही वनसमित्यांनी त्या ठिकाणी जमा करण्यात येणार्या करामध्ये आपला वाटा मागितल्याने आज पुन्हा कर जमा करण्यास स्थगिती देण्याचा निर्णय उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी घेतला.
गेले दोन-तीन दिवस या विषयावरून झालेल्या वादानंतर आज पारपोली ग्रामस्थांनी श्री. चव्हाण यांची भेट घेतली व तो धबधबा आमच्या गावच्या हद्दीत येत असल्याने आम्हाला कर जमा करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली. मात्र कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे श्री. चव्हाण यांचे म्हणणे आहे. आज पारपोली सरपंच रेश्मा गावकर, उपसरपंच प्रमोद परब, सदस्य संदेश गुरव, तातोबा जाधव, बुधाजी जाधव, केशव जाधव, अजित तेजम, अमित जाधव, दिपक पास्ते, हेमंत गावकर, एकनाथ गावकर, प्रितेश कलांगट, मनिष गावकर, सुर्यकांत तेजम, वासुदेव परब, गौरेश तेजम, परेश तेजम आदीनी भेट घेतली. त्यावेळी हा धबधबा आमच्या हद्दीत येत असल्याने आम्हाला करवसुलीची परवानगी द्या, पोलिस बंदोबस्त द्या आणि आमचे नुकसान करू नका अशी मागणी केली. यावेळी होणारे वाद लक्षात घेता काही दिवस थांबा आपण पुन्हा एकदा तिन्ही वनसमित्यांशी चर्चा करू आणि निर्माण झालेला वाद सोडवू असे यावेळी श्री. चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर वनविभागाच्या निर्णयानुसार आपण नेमकी जमिन कोणाची, धबधबा कोणाच्या ताब्यात आहे याबाबत अधिकृत पुरावे देऊन आवश्यकती लढाई लढू असे श्री. तेजम यांनी सांगितले.