जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
सिंधुदुर्गनगरी, ता. 12:मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरु असलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी १६ जुलै रोजी कुडाळ येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे जेलभरो आंदोलन करणार आहे. या आंदोलनात शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर सहभागी होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सक्रिय सहभागी होणार असून जिल्हाभरातील स्वाभिमान कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सरचिटणीस बाळू कोळंबकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, विनायक राणे, मनीष दळवी, दादा साईल, संतोष नानचे, राकेश कांदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री सामंत यांनी आ नितेश राणे यांनी केलेल्या आंदोलनाचे स्वागत सर्वच स्तरात झाले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे कणकवलीतील रस्त्यांना तात्काळ डांबर पडले आहे. ठेकेदार कंपनी दिवस-रात्र काम करीत आहे. त्यामुळे स्वाभिमान पक्ष आ. राणे यांचे अभिनंदन करीत आहे. मात्र, याचवेळी जिल्ह्यातील सत्ताधारी व पोलिसांनी त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत, असे सांगितले. ४ जुलै रोजी आ. राणे यांनी आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी अधिवेशनात आवाज उठविला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री, सत्ताधारी खासदार व आमदार यांनी अनेकवेळा आवाज उठविला होता. पालकमंत्री केसरकर यांनी गुन्हे दाखल करण्याची तंबी देत काम करण्यासाठी डेडलाइन दिली होती. तरीही दिलीप बिल्डकॉन कंपनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करीत नव्हती. यामुळे जिल्ह्यातील सोशल मीडियावर ‘जिल्ह्यातील सर्वच राजकारणी दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीला विकले गेले आहेत, असा मॅसेज फिरत होता’. स्वाभिमान पक्ष विकला गेलेला नाही हे दाखविण्यासाठी आ. राणे यांनी आपल्या स्टाईलने हे आंदोलन केले. या आंदोलनावर विरोधकांनी चिखलफेक केली असली तरी त्याचे फलित कणकवली नागरिकांना रस्ते सुस्थितीत होण्यात मिळाले आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
पालकमंत्री केसरकर यांच्या हृदयात जागा असलेले त्यांचे निकटवर्तीय सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर या आंदोलनात सहभागी होत असल्याने या आंदोलनाला शिवसेनेचा पाठींबा असल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच या जिल्ह्यात सत्ताधारी असलेले शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण विसरलेत. आम्ही सुद्धा या पक्षात २२ वर्षे काम केले आहे. ‘ज्या अधिकाऱ्याला बोलून समजत नसेल. त्याच्या कानाखाली मारून काम करून घ्या’ हि बाळासाहेबांची शिकवण आहे. याची आठवण यावेळी श्री सामंत यांनी यावेळी करून दिली आहे. तसेच आम्ही केवळ अधिकाऱ्याना वठणीवर आणीत नाही. तर ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाचे तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून ऑडिट करीत या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले. १६ जुलैचे सर्व पक्षीय जेलभरो आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वाभिमान पक्ष सक्रिय सहभागी होणार असून हे आंदोलन लक्षवेधी ठरेल, अशी अपेक्षा श्री सामंत यांनी व्यक्त केली