भरावाच्या ठेकेदाराकडून गॉगल गँगने केलेल्या अर्थपूर्ण तडजोडीची चौकशी करा ; मंदार केणी यांची टीका
मालवण, ता. १२ : आमदार वैभव नाईक यांच्या तोंडी अर्थपूर्ण तडजोड हा शब्द शोभत नाही. याउलट निवडणुकीच्या निधीसाठी खुद्द आमदार नाईकच प्रत्येक कामात अर्थपूर्ण तडजोड करत आहेत. स्वाभीमानवर अर्थपूर्ण तडजोडीचा आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या पक्षातील गॉगल गँगकडे लक्ष द्यायला हवा. भरावाच्या ठेकेदाराकडून या गँगने केलेल्या अर्थपूर्ण तडजोडीची चौकशी करा. उगाच पारदर्शकतेच्या बाता मारू नका अशी टीका स्वाभीमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केली.
पंचायत समितीच्या सभापती दालनात पत्रकार परिषद झाली. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी हल्लाबोल केला. श्री. केणी म्हणाले, गेली तीन वर्षे सुरू असलेल्या कोळंब पुलाच्या दुरुस्तीमुळे कोळंब पंचक्रोशीतील सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. या पुलाच्या दुरुस्तीचे ढिसाळ काम ठेकेदाराकडून होत असताना त्याला एक नोटीसही बजावण्यात आली नाही. पुलाच्या बांधकामासाठी खारे पाणी, बोगस स्टील, पुलाखाली नदीपात्रात चुकीच्या पद्धतीने भराव टाकला यावर आमदारांनी चकारही काढलेला नाही. प्रत्यक्षात साडे तीन कोटी रुपये दुरुस्तीसाठी गरजेचे असताना त्याला साडे आठ कोटी रुपयांचा निधी का लागला याचे स्पष्टीकरण आमदारांनी सांगायला हवे. पुलाच्या दुरुस्तीनंतर १६ ते २० टनाच्या वाहतुकीची मर्यादा का ? १५ कोटीत नवीन पूल होणार असेल तर दुरुस्तीसाठी साडेआठ कोटी रुपये खर्च का केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हिंमत असेल तर आमदारांनी पुलाच्या कामाची चौकशी करण्याची धमक दाखवावीच. तुम्हाला निवेदन देण्याची स्वाभिमानला आवश्यकता नाही. योग्य तेथे निवेदन देऊ. तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची १५ टक्के जादा दराने का केली जात आहेत. ठेकेदाराकडून निवडणुकीसाठी निधी कोण गोळा करत आहे याचीही चौकशी करा. त्यामुळे आमदारांनी आमच्याशी पारदर्शकतेच्या बाता करू नयेत असेही श्री. केणी यांनी सांगितले.