विज प्रश्नावरून आक्रमक : दोडामार्ग-बेळगाव वाहतूक ठप्प
दोडामार्ग / समित दळवी ता. १२ : साटेली-भेडशी आवाड येथे गेले पाच ते सहा दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आज दोडामार्ग-बेळगाव या मुख्य रस्त्यावर आंदोलन केले. जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान रस्त्यावर शेकडो ग्रामस्थ बसल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. विजेच्या प्रश्नामुळे ग्रामस्थ आक्रमक आहेत. आम्हाला न्याय द्या अशी मागणी त्यांच्याकडून सुरू आहे. या आंदोलनात सरपंच लखू खरवत, मायकल लोबो, प्रवीण गवस, सुर्या धर्णे आदींसह शेकडो ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. गेले चार ते पाच दिवस गावात विजेच्या खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार कल्पना देऊनसुद्धा वीज अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. यामुळे शाळकरी मुलांसह लोकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.