पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल…
वेंगुर्ले ता.१२:
बनावट एटीएमचा वापर करून वेंगुर्लेतील एका व्यक्तीच्या खात्यातील ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ४२०,३७९ ,कायदा कलम ६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेंगुर्ले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुराप्पा शिवाप्पा पोत्यागोळ,रा.वेंगुर्ले बाजार (बँक ऑफ इंडिया शेजारी) यांनी १२ जुलै रोजी वेंगुर्ले पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे, की अज्ञात व्यक्तीने १ मे २०१९ रोजी सायंकाळी ४ ते ४.३० च्या दरम्यान त्यांचे बँक खाते मधील बनावट एटीएम कार्ड चा वापर करून त्यावरून ४० हजार रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या, देओघर महिला ब्रँच झारखंडच्या एटीएम मशिनमधून काढले. तसेच एटीएम टू एटीएम ऑनलाइन ट्रांझॅक्शन करून २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत वेंगुर्ले पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. व्ही .डी.पालकर हे अधिक तपास करीत आहेत.