निवती येथे होणाऱ्या “मेरिटाईम म्युझियम” चे स्वप्न भंगले…

295
2

निविदांना प्रतिसाद नाही:आयएनएस विराट नौका स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय…

सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे,ता.१३:
जिल्ह्यातील निवती बंदरावर भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या “आयएनएस विराट” नौकेवर देशातील पहिले “मेरिटाईम म्युझियम” उभारण्याची संकल्पना शासनाकडून गुंडाळण्यात आली आहे.या उभारणीसाठी तब्बल आठ वेळा निविदा प्रक्रिया काढून सुद्धा कोणीच पुढाकार घेतला नसल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने आयएनएस विराट स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
१९८२ मधील फॉकलंड युद्धांत महत्त्वाची कामगिरी बजावल्यानंतर १९८७ साली भारतीय नौसेनेत सामील झालेली आयएनएस विराट ३० वर्षाच्या सेवेनंतर २०१७ साली निवृत्त झाली होती.ही ऐतिहासिक युद्धनौका स्क्रॅप मध्ये न काढता तिचे संग्रहालय स्वरूपात जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला होता.राज्य शासनाच्या या प्रस्तावास संरक्षण मंत्रालयानेही मान्यता दिली होती.भारतीय नौदलात एकेकाळी अनमोल कामगिरी करणाऱ्या, गौरवशाली इतिहास असणाऱ्या आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यासाठी सुमारे ८५२ कोटींचा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता.राज्य सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्रालयास सादर केलेल्या प्रस्तावानुसार ही नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स येथे किनाऱ्यापासून सात सागरी मैल अंतरावरील समुद्रात काँक्रीट पायाभरणी करून स्थापित करण्यात येईल.
या ठिकाणी असणारे वैविध्यपूर्ण सागरी जैवविश्व पर्यटकांना पाहता येणार आहे. तसेच सेलिंग, स्काय डायव्हींग अशा साहसी सागरी खेळांसाठी तिचा वापर करण्यासोबतच सागरी प्रशिक्षणासाठीही जहाजावर सुविधा उपलब्ध करतानाच या ठिकाणी व्यापारी जहाजावर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रशिक्षण देण्याचाही प्रस्ताव होता. या नौकेवरील वस्तुसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तू, दृकश्राव्य कार्यक्रम, सागरी क्षेत्राचा इतिहास प्रदर्शित करणारे आभासी दालन अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
मात्र, जहाजावर संग्रहालय तसेच हॉटेल चालविणे खूपच खर्चिक असल्याने तसेच या प्रकल्पाचा खर्च प्रचंड मोठा असल्याने मेरीटाईम बोर्डाने अनेकदा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे संरक्षण मंत्रायलाने आयएनएस विराटला स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेतला आहे.

4