तिघे ताब्यात; पोलिसांकडून कारवाई सुरू
कणकवली ता 13 : कलमठ ते खारेपाटण या टप्प्यातील चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या केसीसी बिल्डकाँन च्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी मारहाणीबाबतची तक्रार कणकवली पोलिसात नोंदविली आहे.
जानवली ते कासार्डे तसेच खारेपाटण परिसरात मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्ग सुस्थितीत आणण्यासाठी ठेकेदाराकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा राग मनात धरून कासार्डे परिसरातील तिघांनी काल रात्री केसीसी बिल्डकॉन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यानंतर आज सकाळी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांनी कणकवली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तर कणकवली पोलिसांनी संशयावरून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. कणकवली शहरात ४ जुलै रोजी स्वाभिमान कार्यकर्त्यांकडून चिखल फेक आंदोलन झाले होते. त्यानंतर कणकवली शहरातील महामार्गाचे भर पावसात डांबरीकरण करण्यात आले आणि महामार्ग सुस्थितीत आणण्यात आला. मात्र केसीसी बिल्डकाँ च्या अखत्यारित येत असलेल्या महामार्ग पैकी जाणवली, कासार्डे, नांदगाव या भागात महामार्ग खड्डेमय आणि चिखलमय झाला आहे