कणकवलीमध्ये आंदोलन प्रकरण : १६ जुलैला वेंगुर्लेतील सर्वपक्षीयांचे जेलभरो आंदोलन
वेंगुर्ले, ता.१३ : सिंधुदुर्गातील सुरू असलेल्या महामार्गाच्या अव्यवस्थित कामावरून कणकवलीमध्ये आंदोलन झाले. परिणामी आम. नितेश राणे यांच्यासह नागरिकांवर ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला. हे योग्य नसून दडपशाही राजकारण आहे. अशाप्रकारे सत्ताधारी विरोधी पक्षाला संपवू शकत नाही. त्यामुळे शासनाच्या विरोधात सिंधुदुर्गात प्रथमच सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन १६ जुलैला जेलभरो आंदोलन करीत असून या आंदोलनात मोठया संख्येने वेंगुर्लेतील त्रस्त जनता सहभागी होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
वेंगुर्ले कॅम्प येथे आयोजित या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा परब, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा कुबल, मनसेचे तालुकाध्यक्ष विजय सावंत, रा.महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे तसेच तात्या सावंत, श्री. परब, योगेश कुबल आदी उपस्थित होते.
महामार्गाचे काम गोवा व रत्नागिरी या दोन्ही ठिकाणी हाच ठेकेदार योग्य रीतीने करीत आहे. फक्त आपल्या जिल्ह्यात काम योग्य नाही. हे पालकमंत्री यांचे अपयश आहे. तर मात्र गढूळ पाणी अभियंत्यावर ओतल्यामुळे भाजपचे मंत्री त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करित आहेत. मात्र रोज आपल्या जिल्यातील नागरिक रस्त्यावरचे हे गढूळ पाणी अंगावर पडले तरी ते सोसून आपली कामे करीत आहेत. त्यांची साधी विचारपूस करण्याची माणुसकी या मंत्र्यांकडे नाही. रोज नवनवीन घोषणा करणाऱ्या या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी त्यातील एक तरी काम नीट करावे. आज जिल्यातील एकही रस्त्यावरून नीट चालता येऊ शकत नाही अशी रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. वीज वितरण कंपनीकडून तर वीज पश्नांकडे लक्ष दिले जात नाही. असे अनेक प्रश्न असून या विरोधात सर्व विरोधीपक्षाचे जेलभरो आंदोलन आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनामार्फत पालकमंत्री दीपक केसरकर दबाव आणत असून २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र अशा दडपशाहीला आम्ही घाबरणार नसून जिल्ह्यात शासनाच्या विरोधात ठरविलेले जेलभरो आंदोलन होणारच आहे. या मध्ये वेंगुर्लेतील सर्वपक्षीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.