अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पाल-न्हैचिआड रस्त्याचे काम निकृष्ट

170
2
Google search engine
Google search engine

कोणते आंदोलन करावे ते पालकमंत्र्यांनी करावे जाहिर : कमलेश गावडे

वेंगुर्ले,ता.१३:सुमारे ४ कोटी रुपये खर्च करुन करण्यात आलेला पाल-न्हैचिआड रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. याबाबत वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी कळवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. परिणामी आज ग्रामस्थांना त्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तरी याबाबत पालकमंत्री दिपक केसरकर यांनी अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कसे वागावे व कोणते आंदोलन करावे ते जाहिर करावे अशी संतप्त मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे माजी विभागीय अध्यक्ष कमलेश गावडे यांनी केली आहे.
पाल येथील श्री. गावडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम मंजुर झाले. हे काम संबंधित ठेकेदाराने सुुरु केले असताना अनेक वेळा ग्रामपंचायतीने तसेच नागरीकांनी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करुन हे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगीतले. परंतू संबंधित बांधकामच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. परिणामी आज त्याचे परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत. रस्त्याला गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. ज्या ठिकाणी गावाला वीज पुरवठा करणारा लाईटचा डिपी आहे. त्याच डिपीच्या बाजूला खोदाई करुन रस्त्याचे काम केल्याने हा डिपी पडून मोठी दुर्घटना घडण्याची भिती निर्माण झाली आहे. रस्ता करताना तो निट न केल्यामुळे अनेकांच्या घरात रस्त्यावरील पाणी गेले असून त्यांचे नुकसान झाले आहे. रस्त्याचे कामही निट झालेले नसून ते पुढील पावसाळा येण्यापुर्वीच खराब होणार आहे. या सर्व बाबी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणू दिल्या होत्या. परंतू मुजोर अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सांगावे अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्या पध्दतीने वागावे. आणि त्यांच्या विरोधात आंदोलन केल्यावर आमच्यावरही ३५३ कलमाखाली कारवाईतर होणार नाही ना याबाबत खुलासा कारावा असे म्हटले आहे.