मालवणात सहा ठिकाणी चोरीच्या घटनांमुळे खळबळ

2

कांदळगाव- हडीतील घटना ; चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान…

मालवण, ता. १३ : तालुक्यातील मंदिरे, दुकानांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लांबविल्याची घटना काल मध्यरात्री घडली. सहा ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या चोरीच्या घटना घडत असून चोरट्यांनी आपला मोर्चा मालवण तालुक्याकडे वळविला आहे. काल मध्यरात्री तालुक्यातील कांदळगाव व हडी या गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घातला. मध्यरात्री ग्रामस्थ गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी कांदळगावात प्रवेश करत या गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर या प्रसिद्ध मंदिराला लक्ष्य केले. रात्री मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित भजन कार्यक्रम आटोपल्यावर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी बाबी गुरव हे मंदिराचे सर्व दरवाजे बंद करून घरी गेले होते. मात्र सकाळी गोपाळ गुरव हे मंदिराचे दर्शनी प्रवेशद्वार उघडून आत आले असता त्यांना मंदिराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्री चोर मंदिरात शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. मागील बाजूच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही दरवाजांची कुलूपे तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. मंदिराच्या गाभार्‍याच्या शेजारी असणारी दानपेटी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले. दरवाजाची तोडलेली कुलूपे मागील बाजूच्या झाडाझुडुपात टाकलेली स्थानिक ग्रामस्थांना आढळून आली. या मंदिरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. मात्र त्याचे चित्रीकरण सेव्ह होत नसल्याने रात्रीच्या वेळचे चित्रीकरण उपलब्ध झाले नाही. याबाबत पोलिसांनी मंदिराची पाहणी करत पंचनामा केला. मात्र मंदिर व्यवस्थापनाकडून कोणतीही तक्रार देण्यात आली नाही.
कांदळगाव येथेच रामेश्वर मंदिराच्या अलीकडे असणार्‍या राजन रामचंद्र लाड यांच्या सलून दुकानावरही चोरट्यांनी डल्ला मारत दुकानातील रोकड व चिल्लर असे मिळून सुमारे अडीच हजार रुपये चोरून नेले. कांदळगावातीलच श्री कमरा देवीच्या मंदिरातील दानपेटीही चोरट्यांनी फोडून त्यातील किरकोळ रक्कम चोरून नेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
हडी येथील श्री देवी कालिका मंदिरातील दोन दानपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे ६ हजार रुपयांची रक्कम लांबवली. कालिका मंदिरातही काल आषाढी एकादशी निमित्त रात्रीपर्यंत भाविकांची ये-जा सुरू होती. त्यामुळे मंदिराच्या मंडळींकडून गाभार्‍याच्या दरवाजाला कुलूप करण्याचे राहून गेले असे सांगण्यात आले. याचाच फायदा घेत मध्यरात्री आलेल्या चोरट्यांनी गाभार्‍यात प्रवेश करून तेथे असलेल्या दोन मोठ्या दानपेट्या मंदिराबाहेर आणून त्यांचे दरवाजे फोडून ६ हजाराची रोख रक्कम लांबविली. या दोन्ही दानपेट्या मंदिरा बाहेरील कंपाउंडच्या बाहेर टाकल्याचे दिसून आले. दोन्ही दानपेट्यांमधील चिल्लर चोरट्यांनी तिथेच टाकली. पेट्यांच्या बाजूला पेट्या फोडण्यासाठी वापरलेला मोठा दगड, एक गॉगल व एक बोटातील रिंगही आढळून आली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी याठिकाणी पाहणी करत पंचनामा केला. मात्र मंदिर व्यवस्थापनाकडून याची तक्रार दिली नाही.
हडी सुर्वेवाडी येथील श्री गणेश मंदिरालाही चोरट्यांनी आपले लक्ष्य बनवून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. मंदिराच्या लगत असणार्‍या गिरिधर सुर्वे यांचा स्टॉलही चोरट्यांनी फोडला. मात्र त्यात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही असे ग्रामस्थांनी सांगितले. तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या चोरीच्या घटनांबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या नसल्या तरी पोलिसांची मात्र झोप उडाली आहे. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

1

4