कणकवली पोलिसांत परस्पर विरोधी तक्रार : स्थानिक युवक जखमी
कणकवली, , ता. १३ : केसीसी बिल्डकॉनच्या कर्मचार्यांना मारहाण केल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी कासार्डे परिसरातील 6 जणांना आज ताब्यात घेतले. प्रथमेश उर्फ सनी रणजित पाताडे (वय 25, रा.कासार्डे, द.गावठाण), प्रेषित चंद्रशेखर महाडिक (वय 24, रा.तळेरे), शाहूर विलास राठोड (वय 22, कासार्डे उत्तर गावठाण), अजिंक्य रणजित पाताडे (वय 21), राहुल विलास राठोड (वय 30, रा.उत्तर गावठाण) आणि अनिल अशोक साळकर (वय 28, रा.चाफेड) अशी त्यांची नावे आहेत. तर प्रणय दीपक देवरूलकर (वय 24, रा.कासार्डे) याचा शोध पोलिस घेत आहेत.
कासार्डे जांभुळवाडी ते दक्षिण गावठाण या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. ठेकेदार कर्मचार्यांना सांगूनही ते बुजवले जात नसल्याच्या रागातून कासार्डे-तळेरे परिसरातील युवकांनी केसीसी बिल्डकॉनच्या कर्मचार्यांना मारहाण केली. तर बिल्डकॉनच्या कर्मचार्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. यात एक स्थानिक युवक जखमी झाला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास कासार्डे येथे ही घटना घडली. या नंतर स्थानिक तरूण आणि केसीसी बिल्डकॉन कर्मचार्यांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
कासार्डे दक्षिण गावठाण या भागात केसीसी बिल्डकॉन या कंपनीचा बेस कॅम्प आहे. कासार्डे जांभूळवाडी ते दक्षिण गावठाण या भागात केसीसी बिल्डकॉनच्या अवजड गाड्यांची वाहतूक होत असते. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काल (ता.12) रात्री अकराच्या सुमारास प्रथमेश पाताडे, शाहूर राठोड यांच्यासह अन्य सात ते आठ जण त्या मार्गावरून येत असताना त्यांची कार खड्डयामध्ये आदळली. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी हे तरुण केसीसी बिल्डकॉनच्या बेस कॅम्पमध्ये गेले. तेथील ठेकेदाराचे कर्मचारी गुरमित सिंग, ओंपाल मलीक आदींशी या तरूणांचा वादंग झाला. त्यानंतर स्थानिक तरुण आणि केसीसी बिल्डकॉनचे कर्मचारी यांच्यात लाकडी दांडा, शिगा आदींच्या साहाय्याने जोरदार हाणामारी झाली. यात प्रेषित महाडिक (वय 24, रा.तळेरे) याच्या डोकीस मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तर केसीसी बिल्डकॉन आदित्य प्रताप सिंग (वय 24) यालाही दुखापत झाली आहे. याखेरीज स्थानिक तरुण आणि ठेकेदाराच्या अन्य कर्मचार्यांनाही मार बसला आहे.