२५ जुलै पर्यंत योग्य कारवाई न झाल्यास स्वाभिमान पक्षाचा आंदोलनाचा इशारा
वेंगुर्ले, ता.१४ : वेंगुर्ले तालुक्यात आठ दिवसांपुर्वी तीन ठिकाणी चोरीचे गुन्हे घडले. मात्र अद्यापर्यंत या प्रकरणातील आरोपी पकडले गेले नाहीत. पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येते. राज्याचे गृहमंत्री दिपक केसरकर यांच्या मतदार संघात अशी गुन्हेगारी वाढत आहे. परंतू त्यांच्याकडून दखलही घेतली जात नाही. हि खेदाची बाब असून वेंगुर्ले तालुक्यातील या चोरी प्रकरणात योग्य कारवाई २५ जुलै पर्यंत न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज पक्षाच्या शिष्टमंडळाने लेखि निवेदनाव्दारे वेंगुर्ले पोलिसांना दिला आहे.
वेंगुर्ले तालुक्यात मागील दोन-तीन वर्षात जबरी चोरी, घरफोडी, जबरी मारहाण या सारखे गंभिर गुन्हे घडले आहेत. परंतू त्यांची सखोल चौकशी योग्य प्रकारे झालेली नसल्याचेच दिसून येत आहे. शनिवार ६ जुलै रोजी आरवली येथील प्रसिध्द वेतोबा मंदिरातील फंड पेटी फोडली, पाल येथील श्री देवी खाजणादेवी मंदिरातील फंडपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला तर शिरोडा येथे गावडे यांची मोबाईल शॉपी फोडण्यात आली. हे तीन्ही गुन्हे एकाच वेळी घडले तसेच यांचे सीसीटीव्ही पुटेज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. तरीही गुन्हेगारांना पकडण्यात येत नाही. पोलिस फक्त चौकशीचा फार्स चालू असल्याचे सांगत आहेत.
या तालुक्यातील आ. केसरकर हे राज्याचे गहमंत्रीपद उपभोगित आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही त्यांच्या खात्याचा कारभार योग्य प्रकारे चालू नाही. वेंगुर्लेतच नव्हे तर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याचा कोणताच प्रयत्न करताना ते दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. असाच या खात्याचा कारभार सुरु राहिल्यास गन्हेगार मोकाट फीरतील अशी भिती लोकांना वाटत आहे. त्यामुळे पोलिसांनी वेंगुर्लेतील या तीन्ही चोरी प्रकरणात तात्काळ कारवाई सुरु करावी अन्यथा २५जुलै नंतर शिरोडा पोलिस चेक पोस्ट येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पक्ष जबाबदार रहाणार नसल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. हे निवेदन आज स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष दादा कुबल यांच्यासह जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, वसंत तांडेल, नितिन चव्हाण, जयंत मोंडकर, मनवेल फर्नांडिस, पपु परब, बिटु गावडे, शिवप्रसाद घारे, मारुती दोडनाशेट्टी, नारायण कुंभार, सायमन आल्मेडा, भूषण आंगचेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेंगुर्ले पोलिसांना दिले आहे.