दीपक केसरकर; चांदा ते बांदा योजनेतून भरीव निधी…
सावंतवाडी, ता.१४: धनगर समाज हे निसर्गाचे लेकरू आहे,त्यामुळे या समाजातील मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळल्यास धनगर समाज मागे राहणार नाही.यासाठी चांदा ते बांदा योजनेतून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.याचा फायदा समाजातील लोकांनी घ्यावा व स्वयंरोजगाराची निर्मिती करावी,असे प्रतिपादन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले.येथील तालुका धनगर समाजोन्नती मंडळ,मुंबई यांच्यावतीने आज समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी श्री.केसरकर बोलत होते.
धनगर समाज गेली अनेक वर्षे विविध सोयी-सुविधांपासून वंचित राहिला आहे. हा भटका समाज असल्याने वास्तव्य करत असलेल्या काही ठिकाणी अद्याप त्यांची घरे नावावर होऊ शकली नाही,तर विद्युत पुरवठा,रस्ते,पाणी आदी अत्यावश्यक सुविधा त्यांना उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.या सुविधांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपली हक्काची जमिन उपलब्ध नसेल तर या योजनांमध्ये अडथळे निर्माण होतात.या अडचणी दूर करण्यासाठी हा प्रश्न मी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन यावेळी श्री.केसरकर यांनी दिले.
यावेळी विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केलेल्या व शालेय स्पर्धा परिक्षांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा श्री. केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईचे नवलू गावडे, सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके, मुंबई कार्यकारीणी सदस्य तानाजी वरक, रा. बा. झोरे, सावंतवाडी तालुका कार्यकारीणी सल्लागार जानू वरक, सिताराम लांबर आदी उपस्थित होते.