खासदार विनायक राऊत यांची ग्वाही :आम्हाला धांगडधिंगा घालणारा आमदार नकोय
कणकवली, ता.१४: संदेश पारकर यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम केलंय. त्यांना भाजपकडून त्यांना तिकीट मिळालं तर शिवसेनेची भक्कम साथ त्यांना असेल. ज्या सरकारचं राज्यात सरकार, त्याच पक्षाचा कणकवलीत आमदार असं समीकरण आता व्हायला हवं. विरोधी आमदारची प्रथा मोडीत काढण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. हे शिवसैनिक कणकवलीत संदेश पारकर यांच्या सदैव पाठीशी असतील अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी आज दिली.
भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. श्री.राऊत पुढे म्हणाले, कणकवलीच्या आमदारांचा धांगडधिंगाणा सर्व जनतेने पाहिलेला आहे. ठेकेदारांकडून जाहिराती घ्यायच्या आणि अधिकार्यांना वेठीस धरायचे, हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. आम्हाला धांगडधिंगाणा घालणारा आमदार नको तर सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा आमदार हवा आहे. जर विधानसभेसाठी संदेश पारकर यांचे नाव निश्चित झाले तर त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्व जीव तोडून मेहनत करायला तयार आहोत.
माजी आमदार अॅड.अजित गोगटे यांनीही श्री.पारकर यांना शुभेच्छा दिल्या, कणकवली मतदारसंघ नेहमीच सत्तेच्या विरोधात राहिला आहे. यंदा मात्र हे चित्र बदलायला हवे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असणार आहे. त्यामुळे इथेही युतीचाच आमदार असायला हवा. तसंच ज्यावेळी पक्षाकडून संदेश पारकर यांच्याबाबत विचारणा होईल. त्यावेळी माझा कौल त्यांच्या बाजूनेच असेल.
प्रमोद रावराणे यांनी कणकवली मतदारसंघातील वैभववाडी तालुका संपूर्णपणे पारकर यांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही दिली. कणकवली हे तर पारकरांचे होमपीच आहे. आता देवगड तालुक्यानेही पारकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे.
अतुल रावराणे यांनी पारकर यांचे लढाऊ नेतृत्व असल्याचे सांगताना, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यात पारकर नेहमीच आघाडीवर असल्याचे मनोगत मांडले. नीलम सावंत-पालव यांनी महिला भगिनींच्या सर्वच कार्यक्रम आणि उपक्रमांना संदेश पारकर यांनी भक्कमपणे साथ दिल्याचे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी संदेश पारकर यांच्या कार्याचे कौतुक केले.