गोवा येथे झाला होता अपघात
वेंगुर्ले, ता.१४ : चार दिवसांपुर्वी गोवा येथे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला वेंगुर्ले शहरातील राजवाडा येथील रहिवासी तुषार श्रीकृष्ण नांदोसकर (वय २०) याचा उपचारा दरम्यान अखेर निधन झाले. त्याच्या निधनाने राजवाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजवाडा येथील तुषार हा गोवा-वेर्णा येथे खाजगी कंपनीमध्ये कामाला होता. शिक्षण झाल्यानंतर तो गोव्याला कामाला गेला होता. तेथे भाड्याच्या रुममध्ये तो राहत असे. दरम्यान बुधवारी रात्री कामावर जाण्यासाठी तो आपल्या मोटरसायकलने निघाला. मात्र रस्त्यावरील एका मोठ्या खड्याचा अंदाज न आल्याने त्याची मोटरसायकल खड्यात गेल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये तुषार याच्या डोक्याला जबर मार लागला होता. स्थानिक ग्रामस्थांनी अपघात होताच तात्काळ पोलिसांच्या मदतीने त्याला गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही केली होती. पंरतू चार दिवस उपचार घेत असलेल्या तुषार याची उपचारा दरम्यान शनिवारी प्राणज्योत मावळली. या दुर्घटनेमुळे नांदोसकर कुुटंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. तुषार याच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ, बहिण असा परिवार आहे.