कामे रेंगाळू नये यासाठी अमोल ओटवणेकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
कणकवली, ता.१५: आ. नितेश राणे यांनी चिखलफेक व धक्काबुक्की केलेले उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी बदली मागीतली असून या घटनेनंतर ते दीर्घकालीन रजेवर गेले आहेत.
कणकवली शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जाब विचारत नितेश राणे आणि समर्थकांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलफेक केली होती.या घटनेनंतर शेडेकर व त्यांचे कुटुंबीय अजूनही धक्कातून सावरले नसल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या कुटुंबियांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शेडेकर यांच्या बदलीची मागणी केली होती.
दरम्यान, प्रकाश शेडेकर यांनीही वरिष्ठांकडे बदलीची मागणी केली आहे.या घटनेनंतर कणकवलीत काम करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.बांधकाम विभागाचे सचिव अजित सगाने यांनीही यास दुजोरा दिला आहे.शेडेकर यांनी ट्रान्सफर मागितली असून,त्यांची नियुक्ती पुढे कुठे करावी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. या घटनेनंतर शेडेकर दीर्घकालीन रजेवर गेले आहेत.दरम्यान,शेडेकर यांचा अतिरीक्त चार्ज खारेपाटण उपविभागाचे उपअभियंता अमोल ओटवणेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.