अनिल गावकर:दत्ता सामंतानी केलेली कामे अर्धवट असल्याचा आरोप…
मालवण ता.१५: नेहमी जनतेला त्रास होऊ देणार नाही अशा बढाया मारणारे स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले ठेकेदार दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या मालवण तालुक्यातील ‘चिंदर-लब्देवाडी-भगवंतगड येथे रस्त्याचे काम केले आहे.मात्र त्यांनी हे रस्ताकाम अर्धवट स्थितीत ठेवल्याने डोंगर उतारावरून वाहत येणारे पावसाचे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात व शेतीत घुसत आहे.यामुळे विहिरीतील पिण्याचे पाणी देखील चिखलमय बनले आहे.मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडले तेव्हा आ. नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवर चिखल उडवला आता मात्र स्वतःच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा ठेकेदार दत्ता सामंत यांनी चिंदर येथे रस्ता काम अर्धवट ठेवल्याने लोकांना याचा त्रास होत आहे.त्यामुळे नितेश राणे दत्ता सामंत यांच्यावर चिखल उडवणार का?असा सवाल चिंदर उपसरपंच अनिल गावकर यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजुरी मिळालेल्या चिंदर पालकरवाडी, लब्देवाडी, तेरई रस्ता कामाचा शुभारंभ वर्षभरापूर्वी झाला होता. सुमारे ६ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी ४ कोटी २७ लाख रुपये निधी मंजूर झाला असून गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली. ठेकेदार दत्ता सामंत यांनी रस्त्याच्या सुरवातीच्या ३ किलोमीटर रस्त्याचे काम केले. मात्र चिंदर लब्देवाडी ते बांदिवडे या सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे. रस्त्यावर दगड माती, चिखल, झाडांची तोडलेली मुळे यामुळे रस्त्यावरून प्रवास करणेही धोकादायक बनले असून ग्रामस्थ व शाळकरी विध्यार्थ्यांना याच चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. पाऊस पडला की चिखलाचे पाणी रस्त्यालगतच्या ग्रामस्थांच्या घरात व शेतीत घुसत आहे. ठेकेदार दत्ता सामंत मनमानी पद्धतीने काम करत आहेत. रविवारी येथील ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या.
दरम्यान, येत्या आठ दिवसात उपाययोजना न झाल्यास मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा चिंदर लब्देवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.