हायवे पाहणी दौर्यात पालकमंत्री केसरकर यांची पत्रकार परिषद
कणकवली, ता.15 : कणकवलीकरांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत आम्ही हायवेचे प्रश्न मार्गी लागले. त्याबाबतची बैठक आम्ही 30 जूनला घेतली. तातडीने हायवे डागडुजीची कामे देखील सुरू झाली. मात्र फुकटचे श्रेय घेण्यासाठी राणे आणि त्यांच्या मंडळींनी चिखलफेक आंदोलन केले अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज कणकवलीत केली.
श्री.केसरकर यांनी हायवे अधिकार्यांसमवेत खारेपाटण ते झाराप महामार्गाची पाहणी हायवे अधिकार्यांसमवेत केली. यानंतर ते कणकवली विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, हायवेच्या समस्या मे महिन्यात समजल्या असत्या, तर त्याचवेळी सर्व्हीस रोड आणि पर्यायी मार्ग डांबरीकरण करून घेतले असते. खरे तर ही कामे ठेकेदार आणि महामार्ग विभागाने करायची होती. मात्र दोहोंच्या चुकांचा त्रास कणकवलीकरांना सहन करावा लागला. सर्व कणकवलीकरांनी एकत्र येऊन पक्षविरहीत आंदोलन केले. त्याची दखल मला पालकमंत्री म्हणून घ्यावीच लागली. आंदोलननंतर लगेचच आम्ही मुंबईत सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत बैठक घेतली. एवढेच नव्हे तर दुसर्या दिवशी 30 जूनला कणकवलीत सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली आणि हायवेचे खड्डे बुजविणे व इतर कामांना सुरवात देखील झाली.
ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे ही कामे कराताना थोडा विलंब झाला. मात्र हायवेची कामे सुरू असतानाच स्वाभिमानच्या नेतेमंडळीनी अभियंत्यावर चिखलफेक आंदोलन केले. त्यानंतर जिल्ह्यात पोस्टरबाजी करून हायवेच्या कामांचा श्रेय घेण्यासाठीही खटाटोप सुरू आहे. त्यांनी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी जनता सर्व काही ओळखून आहे. येत्या पंधरा दिवसांत कणकवली शहरातील सर्व अतिक्रमणे काढून महामार्ग मोकळा करणार आहोत. तर खारेपाटण ते झाराप या दरम्यानचे सर्व्हीस रोड पावसाळा संपताच पूर्ण होतील अशीही ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.