दागिन्याचे पॉलिश करणाऱ्या भामट्याकडून शिरोड्यात दोन महिलांची फसवणूक

549
2

वेंगुर्ले : ता.१५
सोन्याचे दागिने सफाई करून देतो असे सांगून फसवणाऱ्यां दोन भामट्यांच्या बोलण्यात येऊन वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गावातील दोन महिलांची फसवणूक आज झाली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी शिरोडा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
आरवली येथील वेतोबा मंदिरातील फंडपेटी चोरी व शिरोडा येथील मोबाईल शॉपी चोरी प्रकरण ताजे असतानाच आज शिरोड्यातील दोन माहीलांची सोने सफाई प्रकरणात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. शुद्ध मराठी बोलणारे दोन व्यक्ती आज गावात फिरत होते. ते आपण पावडरच्या साहाय्याने तांब्याची भांडी चकचकीत करून देतो असे सांगत घरोघरी फिरत आहेत. शेजारी- शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी प्रथम आपल्या तांब्याच्या भांड्यांची सफाई करून घेतली. त्या नंतर त्यांनी आपल्याकडील लिक्विड चे वापर करून सोन्याचे दागिनेही चकचकीत करून देतो असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून या महिलांनी सोन्याच्या बांगड्या व सोन्याची चेन त्यांच्याकडे सफाईसाठी दिली. त्या भामट्यांनी हे दागिने आपल्याकडील लिक्विड असलेल्या डब्यात घातले, आणि पाच मिनिटात ते साफ होतील असे सांगून पाच मिनिटांनी बाहेर काढले व ते दागिने हळदीच्या पुडी मध्ये ठेवायला सांगितले. आपले काम आटपून ते दोघे सफाईचे पयसे घेऊन तेथून पसार झाले. जाताना त्यांनी थोड्या वेळाने तुम्ही जेव्हा ते दागिने हळदीमधून काढाल तेव्हा चकचकीत झालेले असतील असे सांगितले.
दरम्यान काही वेळानी या दोघीनी ते दागिने हळदीमधून काढले असता त्यांचे वजन त्यांना कमी वाटू लागले. घाबरलेल्या या दोघीनी तात्काळ सोनाराकडे जाऊन दागिन्यांचे वजन केले असता वजनामध्ये मोठी घट झाली असल्याचे दिसून येताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. या भामट्यांच्या करनाम्याबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे. पोलिसांनीही अशा व्यक्तींपासून सावध रहा असे आवाहन केले आहे. तसेच असे लोक आढळ्यास त्वरित पोलिसांना संपर्क करावा, असेही जाहीर करण्यात आले आहे.

4