वेंगुर्ले महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व अणसुर सरपंचांची मागणी
वेंगुर्ले, ता. १५ : तालुक्यातील अणसुर धरमगावडेवाडी येथील रस्ता खचल्याने या मार्गाने जाणारी वेंगुर्ला अणसुर मार्गे सावंतवाडी फेरी आतील मार्गाने न घेता घाटी मार्गाने करण्यात आली आहे. यामुळे आत गावात राहणाऱ्या महाविद्यालयीन विध्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आज वेंगुर्ले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच स्वाभिमानाच्या अणसूर सरपंच अन्विता गावडे यांनी याबाबत निवेदनही दिले.
अणसूर सरपंच अन्विता गावडे यांनी याबाबत निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अणसुर धरमगावडेवाडी येथील रस्ता खचल्याने वेंगुर्ला ते अणसुर मार्गे सावंतवाडी जाणाऱ्या एसटी गाड्या अणसुर घाटीमाथ्यावरून परस्पर वळवून सावंतवाडी येथे जात आहेत. यामुळे अणसुर गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देऊळवाडी, गोबराटेंम्बवाडी व निळगावडेवाडी येथील रहिवाशी यांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्याकरिता व याला पर्याय म्हणून या मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या अणसुर सातेरी मंदिर कडून वळवुन सावंतवाडी कडे वळवण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमान तालुकाध्यक्ष दादा कुबल, मनवेल फर्नांडिस, जयंत मोंडकर, पपु परब, वसंत तांडेल, मारुती दौडशानहट्टी, भूषण आंगचेकर,आनंद गावडे यांच्यासहित महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ही बाब वरिष्ठांना सांगून त्याठिकाणी पाहणी करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन आगार व्यवस्थापक दिलीप ठुम्बरे यांनी दिले.