Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआम. नाईक यांच्यामुळेच 'रस्ता' काम रखडले : दत्ता सामंत...

आम. नाईक यांच्यामुळेच ‘रस्ता’ काम रखडले : दत्ता सामंत…

राजकीय आकसापोटी राजकारण ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे चिंदरमधील काम दर्जेदारच

आचरा, ता. १५ : तालुक्यातील चिंदर गावात पालकरवाडी-लब्देवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेले काम प्रगतीपथावर आहे. हे रस्ता काम पूर्ण होऊन ग्रामस्थांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होत असताना गावातील काही व्यक्ती राजकीय आकसापोटी ‘रस्ता’ कामाचे राजकारण करत आहेत. जर या कामाबद्दल ग्रामस्थांचा आक्षेप असता तर याबाबत ग्रामपंचायतीत तक्रारी प्राप्त झाल्या असत्या. पण अशा तक्रारीही चिंदर ग्रामपंचायतीकडे नाहीत. त्यामुळे या कामाचे काही लोक राजकारण करत असल्याचा आरोप चिंदर लब्देवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी केला.
दरम्यान चिंदर रस्त्याचा ठेका आमदार वैभव नाईक यांच्यामुळे सहा महिने रखडला. त्यामुळे काम करण्यास विलंब झाला. अन्यथा पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले असते. मात्र जरी कामास विलंब झाला तरी लवकरात लवकर दर्जात्मक काम पूर्ण केले जाईल. ग्रामस्थांच्या सूचनेचा आदर करूनच काम सुरू असल्याची माहिती कामाचे ठेकेदार दत्ता सामंत यांनी दिली.
सहा किलोमीटर लांब रस्त्यापैकी सुरवातीच्या चार किलोमीटर रस्त्याचे काम गतिमान झाले. मात्र लब्देवाडी ते बांदिवडे तर या सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. वाटेत दगड माती, चिखल, झाडांची तोडलेली मुळे यामुळे रस्त्यावरून प्रवास करणेही धोकादायक बनले आहे. रस्ता सपाटीकरण करताना गटार बुजवल्याने डोंगर उतारावरून पावसाचे सर्व पाणी घर, परिसर व शेतात घुसत आहे. विहिरीतील पिण्याचे पाणीही चिखलमय बनले आहे. असा आक्षेप नोंदवत चिंदर ग्रा. प. सदस्य समीर लब्दे व अन्य ग्रामस्थांनी उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गावातील
काही ग्रामस्थांनी आज आपली भूमिका मांडली.
यावेळी विनोद लब्दे, शरद लब्दे, आबा लब्दे, जितेंद्र वराडकर, सुनील लब्दे, सुनील साटम, अनिल साटम, सागर परुळेकर, दीपक लाड, स्वप्नील मिठबावकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
चिंदर पालकरवाडी, लब्देवाडी ते तेरई हा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण व्हावा ही मार्गावरील ग्रामस्थांची मागणी पूर्ण होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. ग्रामस्थ सहकार्य करत असताना काहीजण राजकारण करत आहेत असे स्वप्नील मिठबावकर यांनी सांगितले. मार्गावरील वीज खांब हटविण्यास वीज वितरण विभागाकडून विलंब होत असल्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडथळा येत आहे याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments