राजन पोकळे : महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीरासह राबविणार विविध उपक्रम
सावंतवाडी, ता. १५ : पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी शिवसेना व पालकमंत्री दिपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वह्यावाटप आदी उपक्रमासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून पालकमंत्री दिपक केसरकर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून चांदा ते बांदा योजनेंतर्गत दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांना गाईंचे व कोंबड्यांचे वितरण प्राथमिक स्वरुपात करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. पोकळे यांनी श्री. केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर, भारती मोरे, रश्मी माळवदे, दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, शब्बीर मणियार, अशोक दळवी, राघोजी सावंत, सागर नाणोसकर, डॉ. सुबोधन कशाळीकर, धीरज सावंत, गजा नाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पोकळे म्हणाले. पालकमंत्री दिपक केसरकर यांचा 18 जुलैला तर उद्धव ठाकरे यांचा 28 तारखेला वाढदिवस आहे. या निमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 16 व 17 जुलैला सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबीर होणार आहे. या ठिकाणी पूर्व तपासणी करून आजारी रुग्णांना पुढील तपासणीसाठी अन्य हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी महिला शिवसेनेच्यावतीने रुग्णालयात नॅपकीन वाटप करण्यात येणार आहे. 17 तारखेला कुटीर रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. 18 तारखेला सकाळी सायकल रॅली होणार आहे. त्यानंतर पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम येथील बॅ. नाथ सभागृहात होणार आहे. यावेळी चांदा ते बांदा योजनेंतर्गत स्टीमकास्ट व जम्प नेटवर्क या कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार्या गाई व कोंबड्यांचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंपनीकडून देण्यात येणारे सेट्ऑप बॉक्सबाबत योग्यते धोरण जाहिर करण्यात येणार आहे. हे प्रमुख कार्यक्रम झाल्यानंतर त्याच ठिकाणी पालकमंत्री केसरकर यांचे औक्षण करून केक कापण्यात येणार आहे.
श्री. पोकळे पुढे म्हणाले, 20 तारखेला शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात येणार आहेत. 21 तारखेला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यात 50 किलोमीटर व 100 किलोमीटर सायकल चालविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येथील जगन्नाथराव भोसले उद्यानाकडून सुरू होणार असून केसरकर यांच्या निवासस्थानी समारोप होणार आहे. 22 जुलैला ज्येष्ठ नागरिकांसाठी येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये कॅरम व बुद्धीबख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर 27 जुलैला नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.