स्वमालकीच्या प्रक्रिया उद्योगासाठी ‘कामधेनू ठेव योजना’

216
2
Google search engine
Google search engine

सतीश सावंत, एम के गावडे यांचे सहकार्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, ता. १५ : अवसाययानात निघालेला जिल्हा दूध संघ आता कर्जमुक्त झाला आहे. दुग्ध विकासासाठी केंद्र, राज्य शासन व नाबार्ड यांच्या चांगल्या योजना आहेत. मात्र, जिल्हा दूध संघाचा स्वतःचा दूध प्रक्रिया प्रकल्प नसल्याने याचा लाभ घेता आलेला नाही. शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ मिळावा व जिल्ह्यातील प्रत्येक घरात दूध उत्पादनातून क्रांती घडावी, यासाठी स्वमालकीचा प्रक्रिया उद्योग असणे गरजेचे आहे. त्याचसाठी मिळालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हा दूध संघाने तीन वर्षासाठी ‘कामधेनू ठेव योजना’ अंमलात आणली आहे. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील व्यक्तींनी ठेव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा दूध उत्पादन संघ अध्यक्ष एम के गावडे यांनी संयुक्तरित्या केले.
ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब, जिल्हा दूध संघ संचालक उषा पाटील उपस्थित होत्या. जिल्हा दूध संघाने प्रक्रिया उद्योगासाठी कुडाळ तालुक्यातील वाडीहुमरमळा येथे दोन एकर जागा विकत घेतली आहे. मात्र, बँकेच्या धोरणानुसार कोणत्याही प्रक्रिया उद्योगाला कर्ज देताना किमान २५ टक्के स्वभांडवल संस्थेने उभारणे आवश्यक आहे. त्यामुळेच हि कामधेनू ठेव योजना आणली आहे. यामध्ये ५ हजार रुपयांच्या पटीत रक्कम ठेव म्हणून ठेवायची आहे. यात कोणतेही राजकारण नाही. राजकारण विरहित यात सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन या द्वयींनी यावेळी केले.
यावेळी बोलताना सावंत यांनी, अवसाययानात गेलेल्या दूध संघाची ३२ लाख थकीत रक्कम अध्यक्ष एम के गावडे यांनी स्वतः कर्ज घेऊन भरली. त्यामुळे हा संघ पुन्हा उभारी घेत आहे. नियोजित प्रक्रिया उद्योग ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. जिल्हा बँक जिल्हा दूध संघाच्या पाठीशी आहे. केवळ एकत्रित येऊन सर्वानी सहकाराच्या माध्यमातून हे इच्छित धेय्य गाठायचे आहे, असे सांगितले.
एम के गावडे यांनी जिल्हा बँकेने दूध संघाचे ३० लाख व्याज रक्कम माफ केली त्याबद्दल आपण अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संचालक यांचे आभारी आहोत. ठेवी ठेवणाऱ्या व्यक्तींना आम्ही ९ टक्के व्याजाने तीन वर्षात परतफेड करणार आहोत. जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे असणे. त्यातून एक लाख लिटर दूध उत्पादन होणे. १०० ते १२५ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होणे, हे दूध संघाचे उद्दिष्ट आहे. मात्र, जोपर्यंत शासन अनुदान मिळत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. यासाठी स्वमालकीचा प्रक्रिया उद्योग असणे बंधनकारक आहे. हा उद्योग उभारण्यासाठी पुरेसे भांडवल हवे आहे. त्यामुळे हि कामधेनू ठेव योजना आणली आहे. कोल्हापूर दूध संघाला स्वमालकीचा प्रक्रिया उद्योग असल्याने ४० कोटींचे अनुदान केंद्र सरकारने दिले. त्यामुळे त्याचा लाभ त्यांच्या शेतकऱ्यांना झाला. त्याप्रमाणे जिल्ह्यातील लोकांना फायदा होण्यासाठी जिल्हा दूध संघाचा प्रयत्न आहे. याकरिता सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी ठेव रक्कम ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन गावडे यांनी केले.