मालवण- कुडोपी बसफेरी दोन दिवसात पूर्ववत करा…

206
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अन्यथा पुन्हा धडक देऊ ; सभापती, उपसभापती यांचा आगार व्यवस्थापकांना इशारा…

मालवण, ता. १५ : मालवण कुडोपी बसफेरी कातवडमार्गे वळविल्याने शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली असून त्यांना घर गाठण्यास रात्र लागत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात ही बसफेरी कोळंब पुलावरून पूर्ववत सुरू करावी अन्यथा आगारात पुन्हा धडक देऊ असा इशारा सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे यांनी आगारव्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना दिला.
मालवण कुडोपी बसफेरी कातवड मार्गे सोडण्यात येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने आज सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे यांच्यासह पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, कमलाकर गावडे, कुडोपी ग्रामस्थ समीर हिर्लेकर, रंजिता घाडीगावकर, सुप्रिया मगम, संहिता घाडी, दर्शना वाळवे, प्रगती वाळवे, प्रियांका मुणगेकर, वृंदा पडवळ, अशोक वाळवे यांनी येथील आगारात धडक देत आगारव्यवस्थापक श्री. बोधे यांना जाब विचारला.
कुडोपी बसफेरी ही गेली अनेक वर्षे कोळंब पुलावरून सोडण्यात येत होती. मात्र कोळंब पुलाच्या दुरूस्तीमुळे गेली अडीच वर्षे ही बसफेरी आडारी कातवडमार्गे सोडण्यात येत आहे. यामुळे कुडोपी ग्रामस्थांना जादा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ही बसफेरी तोंडवळी-तळाशील तसेच आचरा हिर्लेवाडी अशी फिरून जात असल्याने आचरा तिठा येथे एसटीच्या प्रतीक्षेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. परिणामी त्यांना घर गाठताना रात्र होते. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोळंब पुलाचे काम पूर्ण झाल्याने आता ही बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी सभापतींसह ग्रामस्थांनी केली. यावर आगारव्यवस्थापक श्री. बोधे यांनी येत्या दोन दिवसात ही बसफेरी पूर्ववत केली जाईल असे आश्‍वासन दिले. दोन दिवसात बसफेरी पूर्ववत न झाल्यास आगारात पुन्हा धडक देऊ असा इशारा सभापती कोदे, उपसभापती श्री. बागवे यांनी दिला.

\