एलईडीच्या मासेमारीवर कारवाईसाठी संयुक्त गस्तीसह टोकन सिस्टीम बंधनकारक करावी…

180
2

मच्छीमार चर्चासत्रात मागणी ; मत्स्यविकास मंत्र्याची लवकरच घेणार भेट…

मालवण, ता. १६ : देशात बंदी असलेल्या एलईडीसारख्या विध्वंसकारी मासेमारीवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी, पोलिस व मत्स्य अधिकार्‍यांनी १५ ऑगस्टपासून समुद्रात संयुक्त गस्त घालून टोकन सिस्टिम बंधनकारक करावी अशी मागणी मच्छीमारांच्या चर्चासत्रात मच्छीमारांनी केली. अनधिकृत मासेमारीबरोबरच मच्छीमारांचे गेली अनेक वर्षे दुर्लक्षित प्रश्न आहेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत लवकरच मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची भेट घेत लक्ष वेधण्याचे ठरले.
येत्या काळात शासनाकडून मच्छीमार धोरण निश्चित करण्याची कार्यवाही होणार आहे. त्या अनुषंगाने येथील हॉटेल महाराजा येथे भाजपच्यावतीने मच्छीमारांचे चर्चासत्र घेण्यात आले. अनधिकृत एलईडी मासेमारीसह इतर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यात यावे या मागणीबरोबरच डिझेल अनुदान धर्तीवर आउटबोर्ड मशिनवर पेट्रोल अनुदान द्यावे तसेच यासाठी मच्छीमार संस्थाना डिझेल पंप बरोबर पेट्रोल पंप सुरू करण्याची परवानगी देणे, मच्छीमार गावठाण क्षेत्र व मच्छीमार (कोळी वाडा) गाव क्षेत्र सर्वेक्षण करणे, शास्ती कर रद्द करणे, नदी व समुद्रकिनारी बंधारे बांधणे, मच्छीविक्रेत्या महिलांसाठी सकस आहार केंद्र उभारणी, मच्छीबंदी कालावधीसाठी अनुदान, माथाडी व बांधकाम कल्याणकारी मंडळ धर्तीवर मच्छीमारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे, रापण व्यवसायाला पारंपरिक व्यवसायाचा दर्जा देणे, त्यांना जाळी, होडीसाठी अनुदान तसेच पारंपरिक व्यवसायाचे माहिती केंद्र, राष्ट्रीय सहकार विकास योजनेतंर्गत कर्ज माफी देणे, मच्छीमार होडी, जाळी नुकसान भरपाईबाबत मच्छीमारांच्या सल्ल्यानुसार बदल करणे, जिल्ह्यातील १२१ किलोमीटर सागरी क्षेत्र मच्छीमार क्षेत्र म्हणून विकसित करून पाणी, वीज सारख्या सुविधा उपलब्ध करून देणे या तसेच इतर मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. या मागण्यांबाबत मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले.
मच्छीमार चर्चासत्रात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, तालुका चिटणीस महेश मांजरेकर, शहराध्यक्ष बबलू राऊत, अविनाश सामंत, प्रदीप मांजरेकर, जिल्हा रापण संघाचे सचिव दिलीप घारे, देवेंद्र वस्त, सच्चिदानंद कांबळी, उमेश सावंत, अन्वय प्रभू, महेंद्र पराडकर, मिथुन मालंडकर, प्रदीप मोटे, नीलेश बांदेकर यांच्यासह अन्य मच्छीमार सहभागी झाले होते.

4