कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत
विस्थापित शिक्षक विरोधात एल्गार
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
शासनाचे कमी पटाच्या शाळा बंद करणेचे धोरण व शिक्षक बदल्यांमध्ये विस्थापित शिक्षकांना न्याय न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागाच्या वतीने कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत व बदल्यांतील विस्थापितांना न्याय देणेसाठी शनिवार २० जुलै २०१९ रोजी कोकण भवन नवी मुंबई येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शासनाने १० पटाखालील सर्व जि.प.शाळा बंद करण्याचा घाट घातला असून यामुळे याचा मोठा फटका कोकण विभागाला बसणार आहे. कोकण विभागातील सर्व जिल्हे हे डोंगराळ व दुर्गम असून येथे वाडी वस्त्यांवर शाळा आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत गोरगरीब जनतेच्या मुलांना मोफत शिक्षण मिळत असून या शाळा पट कमी म्हणून बंद केल्यास बहुतांश मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा संभव आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शाळा ही वस्तीपासून १ किमी परिसरात तर उच्च प्राथमिक शाळा ही ३ किमी परिसरात असावी असा नियम आहे. तरीही अशा शाळा बंद झाल्यास चिमुकल्या मुलांना शिक्षणासाठी खूप अंतरावरील पायपीट करावी लागणार आहे. तसेच नदी, नाले, डोंगर, कपारी ओलांडत दूर अंतरावरच्या शाळेत जावे लागत असल्याने मुले मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य राहण्याची शक्यता आहे.
शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणानुसार कोकण विभागात यावर्षी बदल्या झाल्या. या बदल्यात कोकण विभागातून हजारो शिक्षक विस्थापित झाले आहेत. सदर शिक्षकांपैकी पाचव्या व रँडम टप्प्यातून झालेल्या बदल्यातील शिक्षकांचे जिल्हा स्तरावर रिक्त राहिलेल्या सर्व जागा दाखवून समुपदेशन करावे, असा आदेश असताना कोकण विभागात समानीकरण हे तत्व लागू करून पुन्हा अशा शिक्षकांवर अन्याय करण्यात आला आहे. पती – पत्नी विस्थापन सुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणात झाले आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातही कोकण विभाग वगळून अशा इच्छूक शिक्षकांची शासनाने गळचेपी केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत जारी केलेले अन्यायकारक निर्णय रद्द करणे अशा मागण्यांचा समावेश ही या आंदोलनात होणार आहे.
शासनाच्या अशा अन्यायकारक धोरणाबाबत शिक्षक समितीच्या कोकण विभागीय कार्यकारीणीने कोकण भवन नवी मुंबई येथील कोकण आयुक्त कार्यालयावर शनिवार २०जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत धरणे आंदोलन आयोजित केले असून सदर आंदोलनास बहुसंख्य शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभाग प्रमुख अंकुश गोफणे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले आहे.