यांत्रिकी साहित्य खरेदीवरून काँग्रेस आक्रमक

2

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना घातला घेराव
अवजारांसाठी पूर्व परवानगी देण्यासाठी आठ दिवसाची डेडलाईन

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
जिल्ह्यात खरिप हंगाम संपत आला तरी राज्य शासनाच्या कृषी अधीक्षक विभागातून शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळाली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आक्रमक बनली आहे. जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना घेराव घालून जाब विचारला. कृषी अवजारांसाठी उद्दीष्ट व निधी प्राप्त नसल्याने आपण कृषी अर्जांना मंजुरी कशी द्यायची? असा प्रश्न शेळके यांनी उपस्थित केला. मात्र, जिल्हाध्यक्ष सावंत यांनी विभागीय कृषी सहसंचालक यांच्या पत्राचा आधार घेत त्यानुसार कार्यवाही करा व येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या कृषी अवजारांसाठीच्या अर्जाला पूर्व परवानगी द्यावी, अन्यथा आपल्या कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या दालनात घेवून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.
जिल्हयातील शेतकऱ्यांना अद्याप कृषी अवजारे मिळाली नसल्याने जिल्हा काँग्रेसने कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना धारेवर धरले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, प्रांतीक सदस्य तथा प्रवक्ते काका कुडाळकर, माजी सभापती बाळा गावडे, महिला काँग्रेस राज्य सदस्य विभावरी सुकी, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सिद्धेश परब, संतोष तावडे, अल्पसंख्याक अध्यक्ष सर्फराज नाईक, उल्हास मणचेकर, सुधीर मल्लार, विनायक वर्णेकर, मोसील मुल्ला, विजय प्रभू व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष विकास सावंत व प्रवक्ते काका कुडाळकर यांनी शेतकऱ्यांना अद्याप कृषी अवजारे का पुरवली गेली नाहीत, असा सवाल उपस्थित केला. १८ जुन रोजी ठाणे येथील विभागीय कृषी सहसंचालक यांनी आपल्याला पत्र पाठवून २०१९-२० मध्ये उन्नत शेतकरी समृद्ध शेतकरी या योजनेतर्गत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करा, असे आदेश दिले होते. यात ट्रॅक्टर, पाॅवरट्रिलर, रोटाव्हेटर, मळणी यंत्र, भात लावणी यंत्र, ब्रश कटर यासह अन्य कृषी अवजारे वेळेत पुरवा. तसेच सध्या खरिप हंगाम सुरू असल्याने कृषी अवजारांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांना तत्काळ पूर्व परवानगी देण्याची कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यास सांगण्यात यावे, असा पत्रात उल्लेख असताना देखील आपण तालुका अधिका-यांना पत्र पाठवून चालू आर्थिक वर्षांत यांत्रिकीकरणासाठी लक्षांक प्राप्त झाल्याशिवाय आपल्याकडून पुर्व संमती देण्यात येऊ नये. असे न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे सांगितले होते.
आपण कृषी सहसंचालकांच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचा आरोप विकास सावंत यांनी केला. तर आपल्याकडे उद्दीष्ट व अनुदान प्राप्त नसल्याने आपण काहीच करू शकत नसल्याचे कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांनी सांगितले. तसेच १५ कोटी रूपये अनुदान लागेल एवढे शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र अनुदान व उद्दीष्ट प्राप्त नसल्याने मी काहीच करू शकत नाही असेही शेळके यांनी स्पष्ट केले.
तरिही आपण कृषी सहसंचालक यांच्या पत्राचा आधार घेऊन कार्यवाही करावी. तसेच याबाबत तालुका कृषी अधिका-यांना शेतकऱ्यांच्या अर्जांना पूर्व परवानगी देण्यात यावी अशी सूचना शेळके यांना विकास सावंत यांनी केली. उद्दीष्ट व अनुदान नसेल तर काहीच फायदा होणार नाही असे उत्तर शिवाजी शेळके यांनी दिले. यावर काँग्रेस शिष्टमंडळ आक्रमक होत शेळके यांना धारेवर धरले. अशी बेजबाबदार विधाने करताना आपल्याला काहीच का वाटत नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सावंत यांनी दिला.

10

4