मुंबई पाठोपाठ सिंधुदुर्गात लेप्टो तापसरीचे सर्वाधिक रुग्ण…

2

सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे ता.१६:  मुंबई पाठोपाठ लेप्टो तापसरीचे सर्वाधिक रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याचे समोर आले आहे.या वर्षी १५ जुलै पर्यत मुंबई मध्ये सर्वाधिक ३५ तर त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ पेक्षा जास्त लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.राज्य साथरोग नियंत्रण समितीच्या बैठकीत ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.
पावसाळा सुरू झाला की,सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तापसरीचे प्रकार डोके वर काढतात.पावसाळ्यात लेप्टो,डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना,येथील आरोग्य यंत्रणा अनेकदा हतबल ठरते.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात लेप्टो, डेंग्यू,स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक झाली.सध्या कोकणासह मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून,लेप्टोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने संबधीत जिल्हा आरोग्य विभागास खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.
यावेळी १५ जुलै पर्यंतची तापसरीची आकडेवारी जाहीर करण्यात आली.त्यानुसार लेप्टोचे मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण तर त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.राज्यात स्वाईन फ्लूचे 1,773 रुग्ण आढळले असून त्यातील 191 जणांचा मृत्यू झाला आहे.यावेळी माकडतापाबाबतही आढावा घेण्यात आला.राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच माकडतापाचा प्रभाव असून 2016 मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून 24 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून 465 पेक्षा जास्त जणांना माकडतापची लागण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळ्यात माकडतापाचा तर पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू या तापसरींचा प्रभाव असतो.आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष साळुंके, आरोग्य आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, सहआयुक्त डॉ.सतीश पवार आदी उपस्थित होते.

0

4